मुरुड/ जंजिरा : काशिदचा समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी सकाळी समुद्रकिनारी एक सांबर पळत होते व काही कुत्री त्याच्यामागे धावत होती. यामुळे जिवाच्या आकांताने हे हरीण समुद्राच्या पाण्यात शिरले यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. गावाला लागून असलेल्या फणसाड अभयारण्यातून हे सांबर समुद्राच्या दिशेला आले असल्याचे येथील ग्रामस्थांना समजले. सर्वप्रथम फणसाड वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी तडवी यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्वांनी कुत्र्यांना हुसकावले मात्र ते सांबर आणखीनच पाण्यात शिरू लागले. पावसाळी वातावरणात खवळलेल्या समुद्रात शिरणे अशक्य असते. लगेचच वनपाल एम. एम. पाटील, एम. डी. टेमकर, एस. एच. पेडवी यांनी ग्रामस्थांसह प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र तोपर्यंत हरीण समुद्रात आत शिरले आणि त्याचा बुडून मृत्यू झाला.मादा जातीचे हे सांबर किमान १५० किलो वजनाचे होते. हिंस्त्र श्वापदाच्या अथवा चोरट्या शिकारींच्या पाठलागात हे सांबर फणसाड अभयारण्य क्षेत्र सोडून भरकटलेल्या अवस्थेत समुद्रकिनारी आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे पावसाळ्यात चोरटी शिकार मोठा प्रमाणात होते असे अनेकदा निदर्शनास येते. आदिवासी आता अशा शिकार करत नाहीत, मात्र अवैध शिकारीचे प्रकार घडतात. त्यामुळे हा प्रकार अवैध शिकारींच्यामुळे झाल्याचा आरोप निसर्गसाथी संस्थेचे कार्यकर्ते बाबू सुर्वे यांनी केला. या हरणाचा पंचनामा करून त्याबाबत पूर्ण चौकशी करणार असल्याचे फणसाड अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
काशिद समुद्रात बुडून सांबराचा मृत्यू
By admin | Published: July 06, 2016 1:52 AM