पगडीचा डोंगर सरसगड...
By राजेश भोस्तेकर | Published: August 13, 2023 02:20 PM2023-08-13T14:20:49+5:302023-08-13T14:21:53+5:30
रायगड जिल्ह्यातील या गडकिल्ल्यांमध्ये काही असे किल्ले आहेत जे आजही अपरिचित राहिले आहेत.
- राजेश भोस्तेकर
रायगड जिल्ह्यातील या गडकिल्ल्यांमध्ये काही असे किल्ले आहेत जे आजही अपरिचित राहिले आहेत. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात वसलेला सरसगड त्यापैकीच एक. सरसगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून रायगड जिल्ह्यातील पाली डोंगर रांगेतील सरसगड किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने चढाईसाठी मध्यम समजला जातो. पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाण. पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते. पाली गावच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्र भिंत उभी आहे.
या गडाचा उपयोग मुख्यत: टेहळणीसाठी होत असावा, शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतले आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी दाेन हजार होन मंजूर केले. स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत या गडाची व्यवस्था भोर संस्थानांकडे होती. सरसगड दूरवरून पगडीसारखा दिसतो. त्यामुळे त्यास पगडीचा किल्लाही म्हटले जाते. बाजूला तीन सुळके असलेला डोंगर तीन कावडीचा डोंगर म्हणूनही ओळखला जातो.
कसे जावे?
गडाला दोन प्रवेशद्वार असले तरी गडावर जाण्याचा प्रमुख मार्ग हा दिंडी दरवाजातून आहे आणि अलीकडे हा एकच मार्ग वापरात आहे. दिंडी दरवाजापर्यंत जाण्यासाठी पाली गावातून गेलेली एक पायवाट आपल्याला एक तासाच्या चढाईनंतर गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांपर्यंत आणून सोडते. ही वाट मळलेली असल्याने आणि जागोजागी दिशादर्शक असल्यामुळे या मार्गावरून जाताना चुकण्याची शक्यता फार कमी आहे.
ही ठिकाणे पाहण्यासारखी
सरसगड हा किल्ला त्याच्या थरारक पायऱ्यांच्या रचनेमुळे अलीकडे प्रसिद्धीस येत आहे. सरसगडावरील पायऱ्या चढण्याआधी डाव्या बाजूला एक लहानसे भुयार लागते. हे भुयार अतिशय अरुंद आहे. या भुयारातून एकावेळी एकच व्यक्ती जाईल एवढीच जागा आहे. सरसगडावरील ८० अंश कोनातील या थरारक पायऱ्या अखंड दगडात कोरलेल्या असून त्यांची उंची दीड ते दोन फुटाएवढी आहे. सरसगड हा दोन-तीन तासात सहजपणे न्याहाळता येतो. पायऱ्या चढून गेल्यावर समोर दिसणारी दिंडी दरवाजाला लागूनच असलेले तिहेरी तटबंदीचे रचना आपणास बघायला मिळते.