निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच जिल्ह्यात सारी या साथीच्या आजारानेही नागरिक त्रस्त आहेत. मागील दहा महिन्यांत सारीचे १६० रुग्ण आढळले आहेत, तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबरोबरच सारी आजाराचे संकट उभे राहिण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला कोरोनाला रोखतानाच सारीवरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
सारीचा ताप समूहरोग म्हणून गणला जातो़. सारी आणि कोरोना हे दोन वेगवेगळे आजार असले, तरी या दोन्ही आजारांची प्राथमिक लक्षणे सारखीच असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. सारीच्या रुग्णांवर वेळीच उपचार झाल्यास, तो पूर्णबरा होऊ शकतो. या तापाच्या आजारात जंतुसंसर्ग होऊन सूज येते़. त्याचबरोबर न्यूमोनिया होऊन रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण खालावते. त्यामुळे हृदय, मेंदू, किडनी निकामी होतात.शरीरात जंतुसंसर्ग झाल्याने आजाराचे वेळेवर निदान होत नाही. त्यामुळे तापाचे विषाणू रक्तात मिसळतात. रक्त तपासणीनंतरही आजाराचे निदान होत नाही़ त्यामुळे त्याचे रुग्ण लवकर लक्षात येत नाहीत. जिल्ह्यात ऑक्टोबर, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत रुग्णवाढ झाली आहे. या महिन्यांत हवामानात सारखा बदल होत राहिल्याने रुग्ण वाढले आहेत.
सारीच्या रुग्णांसाठी वेगळी व्यवस्थाया आजारामध्ये सर्दी, खोकला, ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ही लक्षणे असतात. जिल्हा रुग्णालयात वेगळा वाॅर्ड तयार करून या रुग्णांवर उपचार होत आहेत. रुग्णांना वेळोवेळी औषध देत, त्यांचा ताप ही थर्मामीटरने तपासण्यात येत होता, तसेच या साथीवर मात करण्यासाठी पौष्टिक आहार ही महत्त्वाचा आहे.
मास्कसह सामाजिक अंतर राखणे अत्यावश्यकजिल्ह्यात सारीबाबत आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू आहे. जे कन्टेन्मेंट झोन नाहीत, अशा ठिकाणी घरांचे सर्वेक्षण केले आहे, तसेच नागरिकांनी मास्कचा वापर करीत सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. - डाॅ.राजीव तंबाळे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय