सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची २९५ वी पुण्यतिथी, भारतीय नौसेनातर्फे करण्यात आले अभिवादन
By राजेश भोस्तेकर | Published: July 4, 2024 11:22 AM2024-07-04T11:22:39+5:302024-07-04T11:23:12+5:30
भारतीय नौसेनेच्या वतीने कोमोडोर ऋषीराज कोहली सी ओ आय एन एस आंग्रे यांनी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
अलिबाग : सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या २९५ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त रघुजीराजे आंग्रे यांचे "गाज" फाउंडेशन आणि अलिबाग नगर पालिका परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम ४ जुलै रोजी समाधीस्थळ येथे आयोजित केला होता. भारतीय नौसेनेच्या वतीने कोमोडोर ऋषीराज कोहली सी ओ आय एन एस आंग्रे यांनी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. रायगड पोलीस दलातर्फे सरखेल कान्होजी आंग्रे यांना मानवंदना देण्यात आली. बँडपथक तर्फेही धून वाजवून गीत सादर केले.
अलिबाग शहरातील सरखेल कान्होजी आंग्रे समाधी स्थळी कार्यक्रम संपन्न झाला. सरखेल आंग्रे यांचे विद्यमान वंशज रघुजीराजे आंग्रे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्याधिकारी,अलिबाग नगर परिषद अंगाई साळुंखे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि उपस्थित मान्यवर यांनीही पुष्पहार घालून अभिवादन केले. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पूर्णकृती पुतळ्याला ही मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले.
अलिबाग नगरपरिषद शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या सरखेल कान्होजी आंग्रे याच्यावर घेतलेल्या भाषण स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यानी मान्यवर यांच्या समोर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे भाषण सादर केले. अभिवादन कार्यक्रम नंतर मान्यवर जनता शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.