निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक समजली जाते. जिल्ह्यात २१० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आखाडा सुरू आहे. यावेळी दुसऱ्यांदा थेट सरपंचपदासाठी निवडणूक होत असून, निवडणूक रिंगणात तरुणाई उतरलेली दिसत आहे. २१० ग्रामपंचातींपैकी ८५ ग्रामपंचायतींत सरपंचपदाचे उमेदवार हे २५ ते ३५ वयोगटातील आहेत. यामुळे ज्येष्ठांचे टेन्शन वाढले असून, तरुण विरुद्ध ज्येष्ठ अशी लढत पाहायला मिळणार आहे.
तरुणांचा गावातील दांडगा संपर्क आता त्यांची जमेची बाजू होत असून, मतदारही तरुणाईवर आता विश्वास दाखवत असून, ग्रामपंचायतींचा कारभार हाती देत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत तरुण वर्ग उतरला आहे. ही संख्या पाहता, निवडणुकीचा निकाल यावेळी काही वेगळीच चित्र निर्माण करणार यात शंका वाटत नाही. सरपंच थेट जनतेतून निवडून जाणार असल्यामुळे यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे.
सरपंचपदासाठी ४८५ जण रिंगणात
२१० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर होती. अर्ज मागे घेतल्यानंतर २१० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ४८५, तर सदस्यपदासाठी ३३९५ उमेदवार रिंगणात आहेत. यात सरपंचपदासाठी २५ ते ३५ वयोगटातील ८५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
जिल्ह्यातील नेत्यांचे लक्ष ?
- ५ नोव्हेंबरला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीतून गावपातळीवरून नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची समीकरणे तयार होत असल्याने आपलाच सरपंच राहावा, या उद्देशाने ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांमार्फत ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी नेते मंडळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यावर लक्ष ठेवून आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी महाडच्या ५२ ग्रामपंचायती आम्ही जिंकणार असा दावा केला आहे.
निवडणूक बनली हायटेक -
पंचायत राज व्यवस्थेमुळे ग्रामपंचायत आता स्वावलंबी बनली आहे. त्यात १५ व्या वित्त आयोगामुळे सरपंच पदाचे महत्त्व वाढले असून, यंदाही जनतेतून सरपंच निवडायचा आहे. गावकारभार हाती घेण्यासाठी इच्छुकांची फौजच दिसून येत आहे. काहीही होऊ दे; पण खुर्ची आपल्यालाच हवी, यासाठी गावागावांत प्रचाराचा धुरळा उडत आहे. विशेष म्हणजे, मोठ्या निवडणुकांप्रमाणे ग्रामपंचायतची निवडणूक हायटेक झाली असून, होडिंग-पोस्टरचे नव्हे, तर सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर केला जात असतानाच दिसत आहे.
गावच्या सर्वांगिण विकासासाठी राजकारणात आम्ही तरुण पुढे येत आहोत. सध्या तरुणाईसोबत शिक्षणाची जोड आहे. त्यामुळे महीलांचे सवळीकरण, वृध्दांचे विविध प्रश्न, आपंगांसाठी कल्याणकारी योजना गावात राबवून गाव सधन कसा ठेवता येईल यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत. तसेच निवडून आल्यावर पर्यटनाच्या दृष्टीने गावचा विकासावर अधिक भर देण्यात येणार आहे.- हर्षदा म्हात्रे-मयेकर, (सरपंच पदाचा उमेदवार)...गेले अनेक वर्ष गावात रस्ता विज आणि पाणी प्रश्न एैरणीवर होता. एक महीला म्हणून या तिन प्रश्नांने मी स्वता हैराण झाले होते. अनेकवेळा या मुलभुत प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आम्ही ग्रामपंच्यातीमध्ये खेटा घातल्या होत्या मात्र सोयी सुविधांची पुर्तता न झाल्याने गावातील आम्ही तरूण एकत्र येऊन हि ग्रामपंच्यात निवडणूक लढवित आहोत.- आजिता गावंड-गजने, (सरपंच पदाचा उमेदवार)