नेरळ : कर्जत तालुक्यातील प्रतिष्ठेच्या कळंब ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्ष-शिवसेना-काँग्रेस यांच्या ग्रामविकास आघाडीचे सदस्य आणि शिवसेना कार्यकर्ते फाईक अहमद खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयानंतर कळंब ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक झाली. दीड वर्षे तत्कालीन सरपंचपदाचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असल्याने कळंब ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांचा बोजवारा उडाला होता.कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीचे शेकापचे सरपंच प्रमोद कोंडिलकर यांच्याविरु द्ध अविश्वास ठराव मार्च २०१४ मध्ये संमत झाला होता. मात्र त्यानंतर कळंब सरपंच पदाचा विषय जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त आणि शेवटी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेला होता. अखेर कर्जत तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेने कळंब ग्रामपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव असलेल्या सरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. पीठासीन अधिकारी ए. एम. राठोड यांच्या अध्यक्षतखाली ही निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी सरपंचपदासाठी शिवसेनेचे फाईक अहमद खान यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता. निर्धारित वेळेत एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी राठोड यांनी फाईक खान यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या विशेष सभेला अकरापैकी आठ सदस्य उपस्थित होते. तर तीन सदस्य गैरहजर राहिले. शिवसेनेचे सदस्य फाईक खान यांच्या सरपंच पदाला शेतकरी कामगार पक्ष-शिवसेना-काँग्रेस या पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा दिला होता. पीठासीन अधिकारी राठोड यांना ग्रामविकास अधिकारी कोलपकर यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
सरपंचपदी फाईक खान बिनविरोध
By admin | Published: October 01, 2015 1:58 AM