वन्य जीवांच्या संरक्षणासाठी प्राणिमित्र केरळला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 01:11 AM2018-08-22T01:11:49+5:302018-08-22T01:12:13+5:30
महाडमधील सात जणांचा चमू; इडुक्की अभयारण्यात हानी
महाड : केरळमधील नैसर्गिक आपत्तीमध्ये आपला अधिवास हरवून बसलेल्या वन्य प्राण्यांच्या विशेषत: सापांच्या संरक्षणासाठी महाड येथील सात प्राणिमित्रांचा एक चमू मंगळवारी केरळकडे रवाना झाला. केरळला गेलेले हे प्राणिमित्र आउल्स आणि सिस्केप या संस्थांचे सदस्य आहेत. केरळमधील एका संस्थेने या दोन संस्थांशी संपर्क साधून या कार्यामध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती.
केरळमधील नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राणहानी आणि मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहेच, त्याचप्रमाणे इडुक्की जिल्ह्यात असलेल्या इडुक्की अभयारण्याचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अभयारण्यातील अधिवास नष्ट झाल्याने विविध प्राणी आणि साप हे नागरी वस्तीमध्ये येऊ लागले असून त्यामुळे मनुष्य आणि प्राणी या दोघांनाही धोका निर्माण झाला आहे. सध्या केरळमध्ये सुरू असलेल्या मदतकार्यात वाइल्ड लाइफ क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सहभाग कमी प्रमाणात आहे, त्यामुळेच तेथील जोस लुईस यांनी सिस्केप आणि आउल्सकडे प्राणिमित्रांची मदत मागितली होती.
त्यानुसार या दोन्ही संस्थांचे सदस्य चिंतन वैष्णव, चिराग मेहता, प्रणव कुलकर्णी, योगेश गुरव, नितीन कदम, ओंकार वरणकर (सर्व महाड) कुणाल साळुंखे (अलिबाग) हे सात जण आज केरळकडे रवाना झाले.