सावित्री दुर्घटनेतील मृतांचे दाखले घरपोच
By admin | Published: August 21, 2016 01:39 AM2016-08-21T01:39:31+5:302016-08-21T01:39:31+5:30
महाड सावित्री पूल दुर्घटनेतील मृतांचे मृत्यू दाखले प्रशासनाकडून घरपोच पोहोचवले जात आहेत. दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांपैकी सापडलेल्या मृतदेहांचे दाखले महाडमधील विविध
दासगाव : महाड सावित्री पूल दुर्घटनेतील मृतांचे मृत्यू दाखले प्रशासनाकडून घरपोच पोहोचवले जात आहेत. दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांपैकी सापडलेल्या मृतदेहांचे दाखले महाडमधील विविध ग्रामपंचायतींमध्ये तयार करण्यात आले.
महाड सावित्री दुर्घटनेत दोन एस.टी.बस आणि एक तवेरा कारमधील ४१ प्रवासी बेपत्ता झाले होते. बेपत्ता प्रवाशांपैकी २८ प्रवाशांचे मृतदेह महाडजवळ विविध गावांत सापडले आहेत. दुर्घटनेतील दोन बस आणि तवेरा सापडल्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली. मात्र अद्याप १२ प्रवासी बेपत्ता आहेत. सापडलेल्या मृतदेहांच्या नातेवाईकांसमोर मृत्यू दाखल्यांचा प्रश्न उभा राहिला होता.
महाड महसूल विभागाने संबंधीत ग्रामपंचायतींकडून तत्काळ मृत्यू दाखले तयार करून घेतले आहेत. हे दाखले एकत्रितपणे मृत व्यक्तींच्या गावातच महसूल विभागाकडून दिले जाणार आहेत. महसुल विभागाने हे मृत्यूदाखले संबधीत तहसिल कार्यालयांकडे पाठवले आहेत.
महाड महसुल विभागाने एकूण २७ दाखले वितरीत केले. यापैकी महाड महसूल विभागाने १५ दाखले तयार केले. महाडमधील केंबुर्ली, दादली, सव, राजेवाडी, वराठी, नडगाव, तेलंगे मोहल्ला, महाड नगर पालिका, या ग्रामपंचायतींकडून दाखले तयार करण्यात आले आहेत. मृत्यू दाखल्यांप्रमाणेच महसूल विभागाकडून नैसर्गीक आपत्ती काळात देण्यात येणारी मदतही तत्काळ दिली. (प्रतिनिधी)
महाड पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींकडून तयार केलेल्या मृत्यू दाखल्यांच्या तारखांत तफावत झाल्याचे दिसून येत आहे. दुर्घटनेत मृत्यू पावलेले आसिफ अहमद चौगुले, आवेश अल्ताफ चौगुले हे दोघे एकाच घरातील असून त्यांचे मृतदेह दादली आणि आंबेत येथे सापडले. मात्र, दोघांच्या मृत्यू दाखल्यांवर वेगवेगळ्या तारखा टाकण्यात आल्या आहेत. याला त्यांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला आहे. तहसीलदार संदीप कदम यांनी हे दाखले ग्रामपंचायतींकडून माहिती घेऊन बदलले जातील, असे सांगितले.