- संदीप जाधव महाड : महाड शहरातील पूर परिस्थितीला कारणीभूत ठरणारे सावित्री नदीपात्रातील जुठे (उंचवटे) काढण्याची तयारी एका ठेकेदार कंपनीने दाखविली आहे. मात्र यातील काही जुठे हे खासगी मालकीचे आहेत. या मालकांनी या जुठ्यांचा मोबदला मागितल्याने हे काम होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.संबंधित जुठे मालकांशी या संदर्भात प्राथमिक चर्चा करण्यासाठी महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी रविवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत काही जमीन मालकांनी बाजारमूल्यानुसार या जुठ्यांची किंमत देण्यात यावी किंवा त्याच क्षेत्रफळाची पर्यायी जागा अन्यत्र देण्यात यावी, अशी मागणी केली. या जुठ्यातून काढण्यात येणारी माती व दगड, गोटे हे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात वापरले जाणार आहे.सावित्री, गांधारी नदीपात्रात चांभारखिंड (४.७९ हेक्टर) , वडवली (0.९६ हेक्टर), दादली (३.८३ हेक्टर) ही तीन उंचवटे खासगी मालकीची आहेत. तर केंबुर्ली आणि पाले गावाच्या हद्दीतील उंचवटे शासकीय मालकीची आहे. सावित्री नदीपात्रात गाळ साठून ही उंचवटे तयार झाली आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत, नदीपात्रात पाण्याला या उंचवट्यांमुळे फुगवटा येतो आणि त्यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण होत असते. ही उंचवटे काढल्यास हा फुगवटा 0.२0 मीटर्सने कमी होऊन पूर परिस्थिती नियंत्रणाखाली येऊ शकते.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या एल अँड टी कंपनीला या कामासाठी माती दगड गोट्यांची आवश्यकता असल्याने महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी ही उंचवटे काढण्यास एल अँड टी कंपनीला राजी केले आणि संबंधित मालकांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत या उंचवट्यांची कोणतीही किंमत संबंधित जमीन मालकांना देण्यात येणार नाही. मात्र येथील माती आणि दगड गोट्यांच्या रॉयल्टीचा काही भाग त्याचप्रमाणे डंपरमागे काही ठराविक रक्कम मालकांना देण्याबाबत एल अँड टी कंपनीशी चर्चा करु न जिल्हाधिकाºयांबरोबरच्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्याचे इनामदार यांनी स्पष्ट केले.बैठकीला संजय परांजपे, अस्लम पानसरे, सुभाष रवळेकर, प्रदीप मेहता, शेखर सावंत यांच्यासह इतर मालक उपस्थित होते. सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.>नदीपात्रातील उंचवट्यांच्या बदल्यात पर्यायी जागेची मागणीजमीन मालकांनी ही उंचवटे ताब्यात देताना, त्यांचा मोबदला म्हणून बाजारभावानुसार होणारी किंमत किंवा त्याच क्षेत्रफळाची पर्यायी जागा अन्यत्र देण्याची मागणी करणारा अर्ज प्रांताधिकाºयांना केला. मात्र या मागणीला प्रांताधिकाºयांनी असमर्थता दर्शविली. जे मालक संमती देतील त्यांचे बेट काढून टाकण्यात येईल आणि उर्वरित उंचवटे तशीच ठेवण्यात येतील, असे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी स्पष्ट केले.
महाडमधील सावित्री, गांधारी पात्रातील उंचवटे हटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 12:23 AM