सावित्रीच्या लेकी शिक्षणास वंचित
By admin | Published: July 7, 2015 11:39 PM2015-07-07T23:39:01+5:302015-07-07T23:39:01+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी केलेल्या सर्वेक्षणात एक हजार २५३ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले.
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी केलेल्या सर्वेक्षणात एक हजार २५३ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. त्यामध्ये प्रामुख्याने ६४३ मुली शिक्षणापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे तळा तालुक्यात एकही बालक शिक्षणापासून वंचित नसल्याचे सर्वेक्षण सांगते.
कधीच शाळेची पायरी न चढणाऱ्या मुलांची संख्या ५०५ असून मध्येच शाळा सोडलेल्या मुलांची संख्या ७४८ असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट होते.
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य सरकारने शाळेत न जाणाऱ्या मुलांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम शनिवारी ४ जुलै रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीत राबविण्यात आली. सर्वाधिक पनवेल तालुक्यात शाळेत न गेलेल्या मुलांची संख्या १३७ आणि मुलींची संख्या १६१ अशी एकूण २९८, तर मध्येच शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा २४७ अशी एकूण ५४५ मुले शिक्षणास वंचित आहेत. यामध्ये मुले ११८ आणि २४७ असा मुलींचा आकडा आहे. कर्जत तालुक्याचा ११ मुले आणि २४ मुली अशी एकूण ३५ मुलांनी शाळा पाहिलेलीच नाही, तर ६२ मुले आणि ५५ मुली अशा एकूण ११७ मुलांनी शाळा मध्येच सोडली असून त्यांचा एकत्रित आकडा १५२ आहे.
पेण तालुक्यामध्ये २ मुले आणि ० मुली अशी एकूण २ मुलांनी शाळा पाहिलेलीच नाही, तर ३६ मुले आणि ३७ मुली अशा एकूण ७३ मुलांनी अर्धवट शिक्षण घेतले आहे. माणगाव तालुक्यात सर्वच मुलांनी शाळेचे तोंड बघितले असून मध्येच शाळेला राम राम ठोकणाऱ्यांचे प्रमाण १६ आहे.
घरोघरी, बसस्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणे, आदिवासी वाड्या-पाडे, झोपडपट्टी, अशा सर्व ठिकाणी शाळाबाह्य मुलांचा शोध सायंकाळी सात वाजेपर्यंत घेण्यात आला होता.
जिल्ह्यामध्ये सात हजार ४२५ सर्वेक्षण अधिकारी, ३८७ विभागीय अधिकारी, ४५ नियंत्रण अधिकारी, ३० नियंत्रण समन्वयक असे एकूण सात हजार ८८७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)