दासगांव : महाड तालुक्यातील दासगांव प्राथमिक आरोग्य केंद्र मुंबई-गोवा महामार्गालगत आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना उपचारासाठी सोयीचे असे हे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत २२ गावे व १८ वाड्यांचे उपकेंद्र आहे. या प्राथमिक आरोग्यकेंद्रावर दोन डॉक्टर काम करीत असून, या केंद्रात एक ा आरोग्यसेविकेची गरज आहे. मात्र हे पद रिक्त असल्याने या ठिकाणी उपचारासाठी रात्री-अपरात्री येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत.महाड तालुक्यातील दासगांवमधील प्राथमिक आरोग्य केंद्र मुंबई-गोवा महामार्गावरचे महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रातंर्गत २२ गावे व १८ वाड्यांचा समावेश आहे. या केंद्रांतर्गत दासगांव, टोळ, देशमुख कांबळे, इसाने कांबळे, राजेवाडी अशी पाच उपकेंद्रे आहेत. या सर्व केंद्रांची देखरेख सबसेंटर असलेल्या दासगांव प्राथमिक आरोग्य केंद्रावरूनच केली जाते. मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींवर उपचारसाठी जवळचे एकमेव दासगांव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या आरोग्य केंद्रावर गेले नऊ महिने आरोग्यसेविकेचे पद रिक्त असल्याने रात्री-अपरात्रीच्या वेळी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत.दासगांव प्राथमिक आरोग्य केंद्रावर वहूर, दासगांव, केंबुर्ली, दाभोळ, टोल, वीर या गावातून गोरगरीब जनता उपचारासाठी येत असते. तसेच या विभागात अपघातग्रस्तांच्या मदतीचे एकमेव ठिकाण आहे. या केंद्रावर महिन्यात सरासरी ६०० ते ७०० रुग्ण उपचार घेत असून, गेल्या जून या एका महिन्यात १,१५० रुग्णांवर या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. मात्र अशा परिस्थितीत जिल्हा आरोग्य विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या ठिकाणी एकच आरोग्यसेविकेचे पद असून, तेही नऊ महिने रिक्त ठेवण्यात आल्याने रुग्णांकडून आरोग्य विभागाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर टोळ गावच्या उपकेंद्रावर आरोग्यसेविका म्हणून असलेल्या जाधव या ठिकाणी रात्रीच्या वेळी रुग्णांना सेवा देतात. या उपकेंद्रांतर्गत सहा गावे आणि १३ वाड्या आहेत. मात्र १३ वाड्यांमध्ये सात वाड्या डोंगराळ भागातील आदिवासी वाड्या आहेत. या परिस्थितीत दोन्ही ठिकाणची जबाबदारी सांभाळणे एकाच आरोग्यसेविकेला अवघड आहे. तरी तातडीने आरोग्यसेविकेची नेमणूक करण्याची मागणी या विभागातील जनतेकडून केली जात आहे. (वार्ताहर)दासगांव, चिंभावे, बीरवाडी अशा तीन आरोग्य केंद्रांवर, आरोग्यसेविकांची पद गेली नऊ महिने रिक्त आहेत. सध्या या ठिकाणी अंतर्गत असणाऱ्या उपकेंद्रावर अदलाबदल करीत आरोग्यसेविकांची ड्युटी लावण्यात येत असून, रुग्णांची गैरसोय दूर करण्यात येत आहे. रिक्त पदांची माहिती जिल्हा आरोग्य कार्यालयाकडे पाठवून आरोग्यसेविकांची मागणीही करण्यात आलेली आहे. काही दिवसांत आरोग्यसेविकांची भरती होणार आहे. प्राधान्याने रिक्त पदे पहिली भरली जातील. - राजेंद्र शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी.
आरोग्यसेविकांचा तुटवडा
By admin | Published: October 31, 2015 11:49 PM