श्रीवर्धनमधील टंचाईग्रस्त गावे टँकरच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:53 AM2018-04-29T00:53:28+5:302018-04-29T00:53:28+5:30
यंदा तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे, त्यामुळे पाणीटंचाईची समस्याही सर्वत्र भेडसावत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागातही सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
संतोष सापते
श्रीवर्धन : यंदा तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे, त्यामुळे पाणीटंचाईची समस्याही सर्वत्र भेडसावत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागातही सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी एक आठवड्यापूर्वीच प्रस्ताव सादर करण्यात आला असला, तरी त्याची परिपूर्ती करण्यात पंचायत समितीला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.
तालुक्यातील साक्षी भैरी (हरेश्वर), गुलधे येथील कासारकोंड, वडशेत वावे येथील आदिवासीवाडी, शेखाडी येथील मूळगाव शेखाडी येथे टँकर पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यात दरवर्षी चांगला पाऊस पडतो. मात्र, पाणी साठवणुकीसाठी आवश्यक उपाययोजना, शासकीय उदासीनता, नागरिकांमध्ये जनजागृतीच्या अभावामुळे अनेक गावांमध्ये मार्चपासून पाणीटंचाई भेडसावू लागते. श्रीवर्धन तालुक्यातील जलसाठ्यात यंदा कमालीची घसरण झाली आहे. पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणलोट योजना, वनराई उपक्रम, शासनाचे विविध प्रकारचे उपक्र म कागदावरच यशस्वी झाले आहेत. वास्तविक पाहता, जनतेस त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे प्रत्यक्षात अनुभवास येत आहे.
तालुक्यातील विविध गावांनी पंचायत समितीकडे २१ एप्रिल रोजी पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवले आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही प्रस्तावास २४ एप्रिल रोजी मंजुरी दिली आहे, तरीसुद्धा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून संबंधित गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.
श्रीवर्धन तालुक्यातील वावे, बोरला, नागलोली, धनगरमलई या गावांतील लोकांना पिण्याचे पाणी मिळणेही कठीण झाल्याने लहान मुले, वयोवृद्ध, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील पाळीव प्राण्यांचा जगण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सदर गावांचे ग्रामसेवक व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसल्याचे स्पष्ट दिसून येते.
धनगरमलई गावासाठी १ जानेवारीला पाणी टँकरचा प्रस्ताव पाठवला आहे; परंतु अद्याप पंचायत समितीकडून पाणीप्रश्न सुटलेला नाही. पाणीप्रश्नाचे राजकारण करणे चुकीचे आहे. लहान मुले व वृद्ध व्यक्तींचे पाण्याअभावी हाल होत आहेत.
- मंगेश कोबनाक, पंचायत समिती सदस्य, वाळवंटी गण
प्राप्त झालेल्या सर्व पाणी टँकरच्या प्रस्तावाचा तत्काळ पाठपुरवठा केला आहे. २४ तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावास मंजुरी दिली आहे. टँकर संदर्भात असलेल्या सर्व निकषांची परिपूर्तता करून संबंधित गावांना पाणी उपलब्ध करून दिले जाईल. प्रस्तावप्राप्त चारही गावांना पाणीपुरवठा केला जाईल.
- सी. बी. हंबीर, सहायक गटविकास अधिकारी, श्रीवर्धन पंचायत समिती
श्रीवर्धन तालुक्यातील ज्या गावांनी पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे, त्या सर्वांना पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, तसे आदेश संबंधित अधिकाºयांना दिले आहेत. कामचुकारपणा केल्याचे दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. पाणीप्रश्नी कुठेही पक्षपात होणार नाही, याची काळजी घेऊ.
- बाबुराव चोरगे, उपसभापती, पंचायत समिती, श्रीवर्धन