प्रकाश कदमपोलादपूर : तालुक्यातील ढवळी, सावित्री, कामथी व कापडे विभागांतील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणा-या पितळवाडी प्राथमिक आरोग्यकेंद्रात कर्मचारी व वैद्यकीय अधिका-यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे परिसरातील गोरगरीब रुग्णांची हेळसांड होत असून, औषधांच्या अपुºया पुरवठ्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.पितळवाडी प्राथमिक आरोग्यकेंद्रात एकूण ११ पदे मंजूर असून, पैकी ७ पदे रिक्त असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी १ पद रिक्त, आरोग्य सहायक १ पद रिक्त, आरोग्यसेविका तीनही पदे रिक्त, स्त्री परिचर १ पद रिक्त, शिपाई १ पद रिक्त व वाहन चालक १ पद रिक्त आहे. सध्या एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांना दिवसरात्र सेवा बजावावी लागत असून, निवासी आरोग्यसेविका नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिला रुग्णांची गैरसोय होत आहे. येथील प्रसूतिगृहाचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत आहेत.पितळवाडी आरोग्यकेंद्रात दररोज ८०हून अधिक रुग्ण येत असून, येथे औषधसाठा अपुरा आहे. त्यामुळे रुग्णांना अतिरिक्त पैसे मोजून उपचार करून घ्यावा लागतो. गेल्या दोन महिन्यांत या विभागात ६ सर्पदंश २० पेक्षा जास्त विंचूदंश आणि ८ श्वानदंश झाल्याने रुग्णांवर येथे औषधउपचार करण्यात आला. तसेच १६ प्रसूतीच्या नोंदी आहेत. हा भाग दुर्गम असून सद्यस्थितीत भात कापणीचा हंगाम सुरू आहे. या केंद्रास सध्या विंचूदंश औषधसाठा उपलब्ध नाही. तसेच रुग्णांसाठी खोकल्याचे औषध, सलाईन, इंजेक्शन व लहान मुलांच्या औषधांची वानवा आहे. त्यामुळे जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे.आरोग्यकेंद्रात अनेक सेवा-सुविधाची वानवा आहे. वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. प्रसूतिगृहाचे बांधकाम अपूर्ण असून, गोरगरीब जनतेला महाडला जाऊन वेळ व पैशांच्या खर्चिक उपचारांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. जिल्हा आरोग्य प्रशासनाने मागणीप्रमाणे औषधसाठा न पुरविल्यास आणि सेवा-सुविधांची पूर्तता व रिक्त पदे त्वरित न भरल्यास आंदोलन करू.- अनिल मालुसरे,सामजिक कार्यकर्ते
आरोग्यकेंद्रात औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:52 AM