दीड महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा गजबजल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:37 PM2019-06-17T23:37:13+5:302019-06-17T23:37:22+5:30
पावसाची उघडीप असल्याने पहिल्या दिवशी स्वच्छंदी वातावरणात विद्यार्थी शाळेत जाताना दिसत होते.
गेले दीड महिना शाळांना सुट्टी असल्याने जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी शुकशुकाट पसरला होता. सोमवारी सकाळी शाळेची घंटा वाजू लागली आणि बच्चे कंपनीने शाळा गजबजून गेल्या. पावसाची उघडीप असल्याने पहिल्या दिवशी स्वच्छंदी वातावरणात विद्यार्थी शाळेत जाताना दिसत होते. स्कूल बसही मैदानावर दिसू लागल्या तशा एसटीच्या बसही शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील फेऱ्या पूर्ववत सुरू झालेल्या दिसल्या. शाळेत नवीन वर्ग, नवीन शिक्षक, नवीन पुस्तकांचा गंध यामुळे सर्वच वातावरण शैक्षणिक बनले होते. अनेक शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब फूल देऊन स्वागत करण्यात आले.
कर्जतच्या विद्या विकास मंदिरात प्रवेशोत्सव
कर्जत महिला मंडळाच्या विद्या विकास शाळेत सोमवारी पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, सर्व विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका मीना प्रभावळकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकारिणी सदस्या वैदेही पुरोहित, पूजा सुळे, मनीषा सुर्वे या उपस्थित होत्या. शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
शालेय साहित्य वाटप
धाटाव : रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा. ग. पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब या शाळेत पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवीच्या नवगत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या विद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका मालती मारुती खांडेकर यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
खारपाड्यात पुस्तक वितरण
वडखळ : पेण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खारपाडा येथे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण दुष्मी खारपाडाच्या सरपंच रश्मी दयानंद भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी सरपंच अरुण घरत, ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी घरत, अमित भगत, शिक्षक, पालक उपस्थित होते.
पनवेलच्या आयुक्तांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस उत्साहाचा होता. पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद, पनवेल महापालिकेसह खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवसाचे औचित्य साधून जल्लोषात स्वागत करण्यात आले. विविध शाळांमध्ये यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल महापालिकेच्या श्री गणेश विद्यामंदिर शाळा धाकटा खांदा याठिकाणी पालिकेच्या माध्यमातून स्वागताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला आयुक्त गणेश देशमुख, महापौर कविता चौतमोल उपस्थित होत्या. आयुक्तांनी स्वत: विद्यार्थ्यांच्या हाताला धरून शाळेत स्वागत केले.
विद्यार्थ्यांचे स्वागत
आगरदांडा : दीड-दोन महिन्यानंतर शाळा सुरू होणार असल्याचे सोमवारी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळा प्रशासनाकडून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
नांदगाव विद्यालयात पाठ्यपुस्तकांचे वाटप
मुरुड तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर, नांदगाव या विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या असणाºया सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहजीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे हे होते. तर त्यांच्या समवेत संचालक अरविंद भंडारी, पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे, शिक्षक प्रतिनिधी दत्तात्रेय खुळपे, सहशिक्षक गणेश ठोसर आदी यावेळी उपस्थित होते.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुला-मुलींना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यांनी पुस्तकांची व्यवस्थित काळजी घेऊन यातून ज्ञान प्राप्त करावे, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. सहजीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके देऊन शाळेची सुरुवात करताना आनंद होत असल्याचा उल्लेख केला.