अलिबाग: टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवून त्यातून सुंदर वस्तू अनेक जण आपल्या कलेने बनवत असतात. अशाच टाकाऊ पाणी बॉटल पासून रोहा तालुक्यातील राजिप शाळा चिंचवली तर्फे आतोणे शाळेतील आदिवासी विध्यार्थ्यांनी फक्त एक रुपया खर्चात आकर्षक आकाश कंदील बनवला आहे. या आकाश कंदीलला ना विजेची गरज आहे ना दिव्यांची फक्त एक रुपयांचा फुगा झाला की आकाश कंदील तयार झाला. त्यामुळे सर्व सामान्यांना परवडेल असे कंदील बनवून या आदिवासी विद्यार्थ्यानी आदर्श निर्माण केला आहे.
दिवाळी म्हटलं की आकाश कंदीलाचे आकर्षण खूप असते. वाढत्या महागाईमुळे गोरगरीब जनतेला आकाश कंदीलाचे भाव परवडत नाहीत. बाजारात विविध आकर्षक कंदील दिवाळी साठी उपलब्ध झाले आहेत. मात्र त्याचे दर हे सर्वसामान्य गरिबाला परवडत नाही. दिवाळीत घरासमोर कंदील लावण्याची परंपरा असल्याने एक रुपया खर्चात विद्यार्थ्यानी परवडेल अशी कंदील बनवले आहेत. प्लस्टिक पाणी बॉटल घेऊन लोक पाणी पितात व रिकाम्या बाटल्या टाकून देतात अशा रिकाम्या बाटल्या जमा करून त्यांना योग्य पद्धतीत कापून ,दोऱ्याचा वापर करून व प्रत्येक बाटलीत एक फुगा टाकून सुंदर आकाश दिव्यांची निर्मिती विध्यार्थ्यांनी केली आहे.
ह्या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक गजानन जाधव उपशिक्षिका हर्षा काळे,उपशिक्षक शबाळु चव्हाण यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तयार झालेल्या आकाश कंदीलने विध्यार्थ्यांनी आपली शाळा सजवली व आनंद व्यक्त केला. टाकावू पासून टिकावू या उपक्रमातून बनविलेले कंदील आकर्षक असून यामुळे सर्वसामान्यांची घरे उजलण्यास मदत होणार आहे. टाकाऊ पाणी बॉटल पासून फुगा व दोऱ्याचा मदतीने आमच्या विद्यार्थ्यांनी सुंदर आकाश कंदील बनवले आहेत अगदी कमी खर्चात म्हणजे फक्त एक रुपयात एक आकाश कंदीलची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली आहे. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री गजानन जाधव यांनी दिली.