मिलिंद अष्टिवकर
रोहा : मुलांच्या पाठीवरचे दप्तरांचे ओझे एक दिवस तरी दूर व्हावे, शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक दिवस दप्तराविना आनंददायी शिक्षण मिळावे, यासाठी दर शनिवारी ‘मुलांनो, शाळेत या दप्तरांविना’ ही संकल्पना चिंचवली शाळेत राबविली जात आहे. परिणामी, या शाळेतील लहानगे विद्यार्थी मात्र चांगलेच खूश झाले असल्याचे चित्र आहे.
रोहा तालुक्यातील येरळ केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद चवरकर यांनी प्रत्येक शनिवारी केंद्रातील शाळेत ‘दप्तराविना शाळा’ हा अनोखा उपक्रम राबविला आहे. कला, कार्यानुभव, शालेय शिक्षण या विषयांवर आधारित मुलांच्या उपजत कलागुणांना संधी देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मागील शनिवारी नूतनवर्ष शुभेच्छा भेटकार्ड बनवण्याचा उपक्रम केंद्रात घेण्यात आला, त्याप्रमाणे चिंचवली तर्फे आतोणे शाळेतील विद्यार्थ्याने भेंडीचे काप, बोटांचे ठसे, दोरा, चमकी या साहित्याचा वापर करून भेटकार्ड बनवले. मुलांना चार भिंतीतील शिक्षण व दप्तरातील शिक्षण कधी कधी कंटाळवाणे वाटते, त्यामुळे त्यांना आठवड्यातून एक दिवस दप्तरमुक्त शाळा भरवून मुलांमधील गुणांना वाव देऊन त्यांचे कौशल्य जाणून घेण्याची संधी चिंचवली शाळेने दिली आहे.शाळेचे मुख्याध्यापक गजानन जाधव व उपशिक्षक जगन्नाथ अब्दागिरे यांनी भेटकार्ड बनवण्यासाठीचे साहित्य उपलब्ध करून दिले व मुलांनी सुंदर असे नूतनवर्ष शुभेच्छा कार्ड बनवले.अशा उपक्रमामुळे स्वअनुभूती मुलांच्या कलाकौशल्याला चालना मिळेल. तर ग्रामीण व आदिवासी तसेच दुर्गम व अति दुर्गम क्षेत्रातील मुलांना शाळेची आवड निर्माण होईल व सर्वांगाने गुणवत्ता विकास होईल.- प्रमोद चवरकर,केंद्रप्रमुख येरळ, रोहामुलांना दप्तरांचे ओझे वाटू नये, प्रचलित पद्धतीमुळे शिक्षण कंटाळवाणे होऊन कोवळ्या वयात लहान मुलांच्या मनावर त्याचे परिणाम होऊ नयेत. यासाठी ‘दप्तराविना शाळा’ या संकल्पनेचे स्वागत केले पाहिजे. हा उपक्रम तालुक्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्याची गरज आहे.- नितीन परब,माजी शिक्षण सभापती, रोहा