अलिबाग - श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथे गुरु वारी दोन गटातील हाणामारीने गावातील शाळा गेली तीन दिवस बंद आहे. शिक्षक उशिरा येण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पालकांनी मुलांना शाळेत जाण्यास मज्जाव केला आहे. याबाबत दिघी सागरी पोलीसठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कुडगाव येथे जिल्हा परिषद शाळेवर नव्याने नियुक्त झालेल शिक्षक शाळेत वेळेत यावेत, तसेच त्यांनी कायमस्वरूपी गावात राहावे यावरून हुज्जत सुरू असताना हा वाद झाला होता. प्रकरण मिटणार असे वाटत असतानाच एका गटातील काही व्यक्तींनी शाळेत मुलांना आणण्यासाठी आलेल्या महिलेचे मोबाइलमध्ये शूटिंग केले. याचा जाब विचारण्यासाठी महिला गेली असता तेथे मोठ्या प्रमाणात वाद झाला. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. दोन समाजात पुन्हा तेढ निर्माण होऊ नये, यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.दोन्ही गटातील पुरु ष व महिलांनी एकमेकांवर विविध आरोप केले आहेत. कुडगाव येथे आठवीपर्यंत शाळा आहे. त्यासाठी शाळेमध्ये तीन शिक्षक कार्यरत आहेत. शाळा समिती आणि शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे शाळा बंद ठेवण्यात आली आहे.दोन गटातील वैयक्तिक वादामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वाद बाजूला ठेवून त्यांनी एकोपा ठेवल्यास पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार होतील. आधीच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा टक्का घसरत चालला आहे. ज्या शाळा स्पर्धेच्या युगामध्ये टिकून आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये असे प्रकार घडत असतील तर ती चिंतेचीच बाब असल्याचे अधोरेखित करते.शाळा समिती, पंचायत समिती, सरपंच आणि जिल्हा परिषद यांनी याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रभारी) बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.दोन्ही गटातील नागरिकांची बैठक घेण्यात आली आहे. त्यांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय हा शाळा समिती, मुख्याध्यापक यांचा आहे. त्यानुसार कधी सुरू करायची हाही त्यांचाच निर्णय आहे.- धर्मराज सोनके,पोलीस निरीक्षक
कुडगाव येथील शाळा तीन दिवस बंद, परस्परांविरोधात गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 2:04 AM