लोहारमाळमधील शाळा धोकादायक; विद्यार्थ्यांच्या जीवास धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:27 AM2019-11-23T00:27:08+5:302019-11-23T00:27:19+5:30
भिंतीला तडे, खांब दुभंगला, दारे-खिडक्या नादुरुस्त
- प्रकाश कदम
पोलादपूर : सर्वांना शिक्षण घेता यावे म्हणून केंद्र आणि राज्य सरकारमार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. ग्रामीण भागात शिक्षणाचा टक्का वाढत आहे. मात्र, पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ गावातील शाळेची इमारत धोकादायक झाल्याने विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या या शाळेत जवळपास १२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक भीतीच्या छायेत आहेत.
शाळेला जुन्या-नव्या अशा आठ वर्गखोल्या आहेत. त्यापैकी ब्रिटिशकालीन इमारतीतील चार आणि चार वर्षांपूर्वी बांधलेली एक, अशा पाच वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. काही इमारतीच्या छप्पर, भिंती, खिडक्या नादुरुस्त झाल्या आहेत. एका वर्गखोलीचा पिलर दुभंगला आहे. त्यामुळे पिलर कोसळल्यास वर्गखोली कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शाळेची पटसंख्या व विद्यार्थ्यांची शिक्षणाची आवड पाहता पोलादपुरातील सामाजिक कार्यकर्ते माजी विद्यार्थी समीर दिनकर साळुंखे यांनी वर्षभरापूर्वी शाळेला दोन वर्गखोल्या स्वखर्चाने बांधून दिल्या आहेत. तर माजी विद्यार्थी पंकज साळुंखे यांनी शाळेला ५० हजारांची खेळणी भेट दिली आहेत. शाळेला माजी विद्यार्थ्यांची मदत वेळोवेळी लाभली. मात्र, शासनाचे शाळेकडे दुर्लक्ष होत आहे.
शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने लोहार ग्रामस्थांसह माजी विद्यार्थी समीर दिनकर साळुंखे, दीपक उतेकर, पंकज साळुंखे हे वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि नवीन इमारत बांधण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत; पण रायगड जिल्हा परिषदेकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. शाळेत पाण्याची समस्याही गंभीर आहे.