उन्हाळी सुटी संपल्यानंतर शाळा उघडल्या; शालेय वस्तू मात्र १० ते १५ टक्क्यांनी महागल्या!

By निखिल म्हात्रे | Published: June 9, 2024 01:33 PM2024-06-09T13:33:03+5:302024-06-09T13:34:56+5:30

येत्या दोन दिवसांत शाळा सुरू होईपर्यंत वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता

Schools open after summer vacation; School supplies however became expensive by 10 to 15 percent! | उन्हाळी सुटी संपल्यानंतर शाळा उघडल्या; शालेय वस्तू मात्र १० ते १५ टक्क्यांनी महागल्या!

उन्हाळी सुटी संपल्यानंतर शाळा उघडल्या; शालेय वस्तू मात्र १० ते १५ टक्क्यांनी महागल्या!

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: दोन दिवसांपासून शाळा सुरू झाल्या असून, सध्या शालेय वस्तूंची खरेदीसाठी पालकांची लगबग सुरू आहे. नवीन पुस्तके, वह्या, वॉटर बॅग आणि खाऊचा डबा मिळणार म्हणून चिमुरड्यांमध्येही उत्साह आहे. या वस्तूंच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

मुलांचे आवडते रंग आणि कार्टूनच्या वस्तू अधिक मागणी असल्याची माहिती दुकानदार दर्शन शहा यांनी दिली. त्यांनी सांगितले की, यंदा वस्तूंच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र, त्याचा खरेदीवर म्हणावा तितका परिणाम दिसत नाही. येत्या दोन दिवसांत शाळा सुरू होईपर्यंत वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यताही दर्शन शहा यांनी वर्तविली.

नागरिकही पावसाळापूर्व छत्र्या, मेनकापड, रेनकोट आदी साहित्य खरेदी करताना पाहावयास मिळत आहेत. मात्र, यावर्षी सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने पालकांना अधिकचा आर्थिक फटका बसला आहे.

लहान मुलांना खोडरबर, पेन्सिल दिवसाआड लागतात. शिवाय, या वस्तू नेहमीच हरवतात. त्यामुळे एकाचवेळी मोठ्या संख्येने वस्तू खरेदी करतो. एकावेळी खरेदी केल्यास त्या स्वस्तही मिळतात.
-प्रणिता सावंत, पालक

बॅगच्या किमतीत अधिक वाढ दिसत आहे. उत्तम बॅग ३५० रुपयांपर्यंत आहे. मात्र, मुलांच्या आवडीसाठी किमतीत झालेल्या वाढीकडे दुर्लक्ष करीत खरेदी करावी लागतेच.
-कुजांळी बानकर, पालक

शालेय वस्तूंचे दर
कटवही (२०० पानी) : ४२० रुपये डझन
फूलसाइज वही (२०० पानी) : ४८० रुपये डझन
छत्री : २०० ते ५०० रुपये
टिफीन डबा प्लास्टिक : ४० ते १५० रुपये
स्टील डबा : १५० ते २५० रुपये
वॉटर बॅग : ४० ते १०० रुपये
वॉटर बॅग स्टील : २०० ते ४०० रुपये
रेनकोट : १०० ते ५०० रुपये

Web Title: Schools open after summer vacation; School supplies however became expensive by 10 to 15 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.