टंचाईचा कृती आराखडा मंजूर
By Admin | Published: March 9, 2017 02:32 AM2017-03-09T02:32:28+5:302017-03-09T02:32:28+5:30
रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी एक हजार ८१३ मिलीमीटर पाऊस जास्त पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई कृती आराखड्यात तब्बल एक कोटी
- आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी एक हजार ८१३ मिलीमीटर पाऊस जास्त पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई कृती आराखड्यात तब्बल एक कोटी ६५ लाख रुपयांनी घट झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्याने तो भूगर्भात मुरण्याचे प्रमाण कमी असल्याने संभाव्य ठिकाणी पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यावर मात करण्यासाठी सहा कोटी २५ लाख रुपयांच्या टंचाई कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.
२०१६-१७ या कालावधीमध्ये तीन हजार ७७७ मि.मी. पाऊस पडला, तर २०१५ मध्ये पर्जन्यमान सरासरी एक हजार ९६४ मि.मी. होते. याची तुलना केली असता जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि खालापूर हे तीन तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये पर्जन्यमानामध्ये १० ते ५५ टक्क्यांची वाढ दिसून येते. अलिबाग, पेण, उरण, मुरुड, माणगाव, रोहे, सुधागड-पाली, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, पनवेल, कर्जत आणि खालापूर तालुक्यांमध्ये दोन ते १० टक्क्यांची घट दिसून येते. जिल्ह्यामध्ये कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने पावसाने सुखद धक्का दिला; परंतु भूगर्भामध्ये पाणी मुरण्याला कमी कालावधी मिळाला. पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या निरीक्षण विहिरींच्या पातळीमध्ये पर्जन्यमान जास्त होऊन देखील विशेष वाढ झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे डोंगराळ भाग, उतार परिसराचा भाग, जमिनीत असणाऱ्या खडकांचा भाग आणि खारेपाट विभागात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता प्रशासनाने गृहीत धरली आहे. यासाठी सहा कोटी २५ लाख रुपयांचा टंचाईकृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर १६ ते डिसेंबर १६ या कालावधीत पाणीटंचाई भासणार नसल्याचे प्रशासनाने गृहीत धरले होते. या कालावधी पाणीटंचाई न भासल्याने खर्चाची तरतूद करण्यात आलेली नाही.
जानेवारी १७ ते मार्च १७ या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाण्याची टंचाई जाणवणार असल्याने दोन कोटी ५० लाख रुपये, तर एप्रिल १७ ते जून १७ या तिसऱ्या टप्प्यासाठी तीन कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील ३६७ गावे एक हजार १०९ वाड्या अशा एकूण एक हजार ४७६ ठिकाणी टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा तसेच विंधण विहिरींसाठी सहा कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, पनवेल, पेण तालुक्यात टंचाई जास्त प्रमाणात जाणवणार आहे.
गेल्या वर्षी कमी पाऊस
गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने टंचाई कृती आराखडा हा सात कोटी ८८ लाख रुपयांचा होता. २९२ गावे, ९२६ वाड्या अशा एकूण एक हजार २९८ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता.
१४० गावे, ४३७ वाड्यांमध्ये ५७७ विंधण विहिरी खोदण्यात आल्या होत्या, तर नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्तीसाठी एक गाव, ६९ वाड्या अशा एकूण ७०, तर तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी एका वाडीचा समावेश होता.
अशा एकत्रित ४३३ गावे, एक हजार ४४३ वाड्यांचा समावेश कृती आराखड्यात करण्यात आला होता. पैकी ७२ गावे आणि ३६४ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यासाठी पाच कोटी ७ लाख रुपयांचा खर्च आला होता. त्याचप्रमाणे ४३ गावे आणि १३४ वाड्यांमध्ये १७७ विंधण विहिरी खोदण्यात आल्या. त्यासाठी अंदाजित सुमारे चार कोटी रुपये प्रशासनाने खर्ची टाकले आहेत.
आॅक्टोबर १६ ते डिसेंबर १६ पहिला टप्पा
खर्चाची तरतूद नाही
जानेवारी १७ ते मार्च १७
दुसरा टप्पा
०२ कोटी ५० लाख रुपये
एप्रिल १७ ते जून १७
तिसऱ्या टप्पा
०३ कोटी ७५ लाख रुपये
- जिल्ह्यातील ३६७ गावे एक हजार १०९ वाड्या अशा एकूण एक हजार ४७६ ठिकाणी टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा तसेच विंधण विहिरींसाठी सहा कोटी
२५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, पनवेल, पेण तालुक्यांत टंचाई जास्त प्रमाणात जाणवणार आहे.