सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे मूर्तिकार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:45 AM2020-08-09T00:45:10+5:302020-08-09T00:45:26+5:30
गणेशोत्सवास दोन आठवडे; बोर्ली पंचतन परिसरातील गणपती कारखान्यांत मूर्तिकारांची लगबग
- अभय पाटील
बोर्ली पंचतन : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश मूर्तिकारांची मूर्ती पूर्ण करण्याची मोठी लगबग सुरू असून, खंडित होणारा वीजपुरवठा मोठी डोकेदुखी ठरत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असल्याने, वीजपुरवठा अखंडित राहावा, अशी मागणी गणेश मूर्तिकारांनी केली आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील जिव्हाळ्याचा व भक्तीचा सण. सध्या गणपती मूर्तिकारांची मूर्तीवर रंगकाम करण्याची मोठी लगबग सुरू आहे. बोर्ली पंचतन, दांडगुरी, आसूफ, दिवेआगर, वेळास, शिस्ते, वडवली, दिघी गावांसह इतरही छोट्या गावांमध्ये शेकडो मूर्तिकार मूर्तिकाम करण्यात दंग आहेत.
चक्रीवादळामुळे महिनाभर वीजपुरवठा खंडित होता. महिन्याच्या कालावधीनंतर या भागातील वीजपुरवठा सुरू झाला खरा, परंतु वीजपुरवठा अद्यापही सतत खंडित होण्याचे प्रमाण मोठे आहे. गणपती कारखानदार यामुळे जास्त त्रस्त झाले आहेत. जनरेटर भाड्याने घेऊन मूर्तिकाम करावे लागते. त्यासाठी लागणारे रॉकेल शिधापत्रिकेमध्ये मर्यादित मिळत असल्याने ते पुरेसे होत नाही, तर पेट्रोल वापरावे, तर तेही नेहमीच्या दरवाढीमुळे मूर्तिकारांसाठी मोठे संकट उभे राहिले.
चक्रीवादळामुळे घराचे पत्रे, छप्पर नादुरुस्त झाल्याने, तयार मूर्ती भिजल्याने त्यांचे नुकसानही मोठे झाले आहे. मूर्तिकारांना घराच्या नुकसानीची भरपाई मिळाली, परंतु लॉकडाऊनमुळे कामगार न मिळण्याचा प्रश्न, आवश्यक साहित्य वेळेत न मिळाल्याने मूर्तिकामात उशीर होणे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. दोन आठवड्यांवर गणेश चतुर्थी आली असल्याने, दिवस-रात्र जागून मूर्तिकाम करावे लागत आहे. मूर्तीच्या अखेरच्या कामात मोठे अडथळे येत आहेत. गणेश मूर्तिकारांनाही विशेष मदत जाहीर करण्याची मागणी मूर्तिकारांतून होत आहे.
आम्ही छोट्या गावातील गणेश मूर्तिकार नहमीच दुर्लक्षित राहिलो आहोत, कोरोनाचे संकट,निसर्ग चक्रीवादळ, महिनाभर नसणारा वीजपुरवठा व आता सततचा खंडित वीजपुरवठा, यामुळे आम्ही मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहोत. शासनाने लक्ष पुरवावे, अन्यथा आम्हा मूर्तिकारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल.
-सूर्यकांत गोवीलकर, गणेश मूर्तिकार बोर्ली पंचतन