सागरी प्रवासी मार्ग ठरताहेत किफायतशीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:40 AM2018-03-15T02:40:39+5:302018-03-15T02:40:39+5:30

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अंतर्गत सागरी मार्गाने प्रवासी वाहतूक होते. वर्षभरात एकूण ७४ लाख ६२ हजार प्रवासी या मार्गाने प्रवास करतात.

Sea passenger routes are worthwhile! | सागरी प्रवासी मार्ग ठरताहेत किफायतशीर!

सागरी प्रवासी मार्ग ठरताहेत किफायतशीर!

googlenewsNext

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अंतर्गत सागरी मार्गाने प्रवासी वाहतूक होते. वर्षभरात एकूण ७४ लाख ६२ हजार प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. पैकी एकट्या रायगड जिल्ह्यातून वर्षाकाठी जवळपास ६३ लाख १८ हजार प्रवासी सागरी मार्गाचा वापर करतात. रायगड जिल्ह्यातील एलिफंटा, मोरा, रेवस, करंजा, मांडवा गेटवे, ससून डॉक, आगरदांडा, अलिबाग, बोर्ली-मांडला, दिघी, जंजिरा, मांदाड, मुरुड, नांदगाव, राजपुरी, रेवदंडा, श्रीवर्धन, थळ या बंदरातून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. यामार्फ त वर्षभरात कोटींच्या घरात महसूल जमा होतो. आधुनिक सागरी प्रवासी वाहतूक हा रायगडच्या पर्यटन विकासाचा नवा आयाम ठरत असून, स्थानिकांच्या सुकर प्रवासासह देशभरातील पर्यटकांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
>जंगलजेट्टीचा महत्त्वाचा वाटा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण रेल्वे या दोन्ही प्रवासी माध्यमांचा उपयोग कोकणच्या किनारी भागातील गावांना अद्याप थेट असा होत नसल्याने, जिल्ह्यांतर्गत सागरी प्रवासी वाहतुकीची कोकणवासीयांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी विचारात घेऊन, सुवर्णदुर्गा शिपिंग अँड मरिन सिर्व्हिसेसचे डॉ. चंद्रकांत मोकल आणि डॉ. योगेश मोकल यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारी सागरी प्रवासी वाहतूक सुरू केली. या प्रवासी बोटींना ‘जंगल जेट्टी’ असे म्हटले जाते. महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रवासी तिकिटाचे दर आणि अन्य आवश्यक परवाने मंजूर केले आहेत. दरवर्षी चार लाख रुपयांच्यावर कंपनी शासनाला महसूल स्वरूपात देत आहे.
इंधनाची मोठी बचत
राज्यातील पहिली फेरी बोट आणि जंगल जेट्टी सेवा रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ-धोपावे या खाडी दरम्यान सुरू करण्यात आली. यापूर्वी तेथील स्थानिकांना दापोली ते राष्ट्रीय महामार्ग आणि पुढे गुहागर असा प्रवास करावा लागत असे. यात इंधन, पैसा व वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होत असे. आता नव्या सागरी सेवेमुळे हा तीन तासांचा प्रवास केवळ सहा मिनिटांवर आला आहे. या यशस्वी सेवेनंतर वाश्वी (रत्नागिरी) ते बागमांडे (रायगड) आणि पुढे दिघी ते आगरदांडा अशा फेरी बोट कार्यान्वित होऊन, आता रत्नागिरी आणि रायगड हे दोन्ही जिल्हे फेरीबोटीद्वारे जोडले गेले आहेत. या नव्या सागरी मार्गामुळे मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत होत आहे.
सुरक्षित, जलद, अल्पखर्चीक प्रवास
सागरी मार्गामुळे सुरक्षित, जलद आणि अल्पखर्चीक प्रवास होत असल्यामुळे, स्थानिकांबरोबरच पर्यटकांनीही या मार्गाला बराच प्रतिसाद दिलेला दिसून येतो. सुवर्णदुर्ग शिपिंग आणि मरिन सर्व्हिसेसच्या माध्यमातून जिल्ह्यांतर्गत सुरू झालेली सागरी प्रवासी वाहतूक, स्थानिकांना व्यावसायिकदृष्ट्या जशी फायद्याची ठरली, तशीच ती कोकणच्या पर्यटन विकासासदेखील मोठा हातभार लावणारी ठरली आहे.
ंमांडवा ते भाऊचा धक्का आधुनिक रो-रो बोट सेवा एप्रिलपासून
येत्या १ एप्रिल पासून मांडवा ते भाऊचा धक्का या सागरी मार्गावर आधुनिक रो-रो बोट सेवा सुरू करणार असल्याची माहिती नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या रो-रो सेवेच्या माध्यमातून मांडवा ते भाऊचा धक्का हे अंतर केवळ १७ मिनिटांवर येणार असून, सध्या अलिबाग-पेण-पनवेल-मुंबई या तीन तासांच्या प्रवासाच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. त्याचबरोबर, इंधन आणि आर्थिक बचत होणार आहे. या रो-रो बोट सेवेत एका वेळी ७० बसेस, २० कंटेनर आणि सुमारे ५०० प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामुळे १ एप्रिलपासून रायगडवासीयांकरिता सागरी प्रवासाचे नवे दालन खुले होणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
>कसा आहे मांडवा रो-रो टर्मिनल
१३५ कोटी २९ लाख रुपयांच्या या प्रकल्पामध्ये २१४ बाय १० मीटरची जेट्टी, ३० बाय ३०चा प्लॅटफॉर्म, २० बाय २२ मी. तरंगता तराफा (फ्लोटिंग प्लांटून), ३६० मी. लाट विरोधक भिंत (ब्रेकवॉटर) व १०० बाय ११५ मी. लांबीचा वाहनतळ बांधण्यात येत आहे. हे काम वेगात सुरू असून, ब्रेकवॉटरचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. जेट्टीसह इतर कामेदेखील ७० टक्के पूर्ण झाली आहेत. केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत महाराष्टÑ सागरी मंडळ (महाराष्टÑ मेरिटाइम बोर्ड) हे काम करीत आहे. जुलै २०१६ मध्ये कामाचे कार्यादेश देण्यात आले होते, तर १ एप्रिलला या सेवेचा शुभारंभ होणार आहे.
>रो-रो सेवेमुळे भाऊ चा धक्का-मांडवा हे अंतर १७ मिनिटांमध्ये, तर नेरूळपर्यंतचे अंतर १४ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. सुमारे ६० ते ७० बसगाड्यांसह १५ ते २० कंटेनर आणि प्रवासीही या सेवेचा लाभ घेऊ शकतील.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
प्रवाशांच्या अपेक्षा काय आहेत?
मांडवा ते गेटवे कॅटमरान बोट सेवेबरोबरच पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रेवस ते भाऊचा धक्का या प्रवासी मार्गावरदेखील आधुनिक बोटींचा वापर करावा. त्याचबरोबर, दुरवस्थेतील रेवस बंदराची
दुरुस्ती आणि प्रवासी सुविधांकरिता नियोजन करावे.
रेवस येथे राज्य परिवहन मंडळाच्या बसेस, बोट आल्यावर पुढील प्रवासासाठी बस त्वरित उपलब्ध होण्याकरिता नियोजनाची गरज आहे.
येत्या १ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या मांडवा ते भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील, रो-रो बोट सेवेच्या माध्यमातून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने मांडवा येथे येऊन पुढे जाण्याकरिता मांडवा ते अलिबाग या रस्त्याची क्षमता नाही. या रस्त्येच्या रुंदीकरणाचे नियोजन करून, सद्यस्थितीतील रस्त्याचे मजबुतीकरण तातडीने करणे गरजेचे आहे.
मांडवा-गेटवे ‘पॉप्युलर’ मार्ग : रत्नागिरी जिल्ह्यातून सागरी मार्गाने पर्यटक वा स्थानिक प्रवासी रायगड जिल्ह्यात आगरदांडा-मुरुड येथे पोहोचल्यावर पुढे मुरुड- मांडवा राज्यमार्गाने तो मांडवा जेट्टी येथे पोहोचतो. मांडवा येथून पीएनपी कॅटमरान बोट सर्व्हिस, मालदार कॅटमरान बोट सर्व्हिस आणि अजिंठा बोट सर्व्हिस यांच्या माध्यमातून पुन्हा सागरी मार्गाने थेट मुंबईत गेटवे आॅफ इंडिया येथे पोहोचतो आहे. सध्या गेटवे ते मांडवा हा सागरी प्रवास अलिबाग, मुरुड, पेण तालुक्यांतील लोकांना नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज जा-ये करण्याकरिता जसा फायद्याचा व सुविधेचा झाला आहे, तसाच सुट्ट्या आणि शनिवार-रविवार पर्यटकांमध्ये मोठा ‘पॉप्युलर’ सागरी मार्ग झाला आहे. या जलमार्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल शासनास मिळÞतो. दररोज सुमारे ३० ते ३५ हजार, तर सुट्ट्यांच्या दिवशी सुमारे १ लाख प्रवासी गेटवे ते मांडवा या सागरी मार्गावर प्रवास करतात.
संकलन - जयंत धुळप

Web Title: Sea passenger routes are worthwhile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.