निवडणुकीतील सर्व दस्तावेज सील
By admin | Published: January 6, 2017 05:57 AM2017-01-06T05:57:27+5:302017-01-06T05:57:27+5:30
रोहा अष्टमी नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक विवादावर गुरुवारी जिल्हा न्यायालय माणगाव येथे सुनावणी होती. या वेळी या निवडणुकीत वापरण्यात आलेले सर्व दस्तावेज
रोहा : रोहा अष्टमी नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक विवादावर गुरुवारी जिल्हा न्यायालय माणगाव येथे सुनावणी होती. या वेळी या निवडणुकीत वापरण्यात आलेले सर्व दस्तावेज, वोटिंग मशिन्स, कागदपत्रे, पुस्तके इत्यादी सर्व सीलबंद करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. ही माहिती रोहा अष्टमी शहरात समजताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. काहीतरी मोठा घोळ या निवडणुकीत झाल्याचे जिल्हा न्यायाधिशांना प्रथमदर्शनी दिसून आल्यानेच हे आदेश पारीत करण्यात आले असावेत, अशी चर्चा गुरुवारी दिवसभर रोहा अष्टमी शहरात होती. याप्रकरणाची पुढील सुनावणी २० जानेवारीला होणार आहे.
रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या नोव्हेंबर २०१६मध्ये संपन्न झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत झालेल्या अनेक गैरप्रकार आणि भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात माजी नगराध्यक्ष समीर जनार्दन शेडगे यांनी माणगाव येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात निवडणूक पिटिशन दाखल केलेले आहे. त्यावर डिसेंबर २०१६मध्ये दोन वेळा सुनावणीही झालेली आहे. या विवादावर गुरुवारी सुनावणी होती, न्यायालयाने सरकारी वकील आणि सामनेवाला यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकू न निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रोहा यांनी वरीलप्रमाणे सर्व दस्तावेज सीलबंद करण्याचे व सीलबंद केलेल्या दस्तावेजांचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी केले आहेत.