दासगाव : महाड तालुक्यात अनेक कंपन्यांचे मोबाइल टॉवर आहेत. दरवर्षी या टॉवरच्या मोबदल्यात शासनाला लाखो रुपये महसूल मिळतो. यावर्षी महसूल भरण्याकामी कंपन्यांनी कुचराई केल्यामुळे महाड महसूल विभागाने जवळपास १४ गावांतील १७ टॉवरला सील ठोकण्याचे आदेश काढले आहेत.महाड तहसील कार्यालयामधून मिळालेल्या माहितीनुसार दासगाव, दाभोळ, महाड, बिरवाडी, करंजाडी, वाळण बुद्रुक, गोंडाळे, शिरवली, शिरगाव, कांबळेतर्फे महाड, केंबुर्ली वरंध, भावे आणि शेळटोली या तालुक्यांतील १४ गावांमध्ये २१ ठिकाणी विविध कंपन्यांच्या मोबाइल टॉवरची उभारणी करण्यात आलेली आहे. पैकी चार टॉवरचे पैसे अदा करण्यात आलेले आहेत. उर्वरित जी. टी. एल., टाटा, एअरटेल, रिलायन्स आणि युनिटी या कंपन्यांचा १७ टॉवरचा महसूल थकीत आहे. ही थकीत रक्कम सुमारे १८ लाख इतकी असून ही रक्कम वसूल करण्याकरिता महसूल विभागाने वारंवार टॉवर कंपन्यांना पैसे भरण्याच्या नोटिसा दिल्या. मात्र, वारंवार नोटिसा मिळूनही या कंपन्यांनी महाड महसूल विभागाला अद्याप न जुमानल्याने अखेर मार्चअखेरच्या आतच महसूल खात्याने ८ मार्च, २०१७ रोजी या कंपनीच्या १७ टॉवरना सील ठोकण्याचे आदेश काढत या १४ गावांतील तलाठी, तसेच मंडल अधिकाऱ्यांना लेखी पत्रक काढून सील ठोकण्याचे आदेश दिले आहेत.सध्या थकीत असलेला १८ लाखांचा महसूल हा २०१६-१७ या एक वर्षाच्या कालावधीमधील आहे. सेवा देण्यास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागणार आहे. ज्या कंपनीच्या टॉवर्सना महाड महसूल खात्याकडून सील ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्या काही टॉवरवर इतर कंपन्यांचे बुस्टर बसवून एक टॉवर दोन कंपन्यांची सेवा देत आहे. अशा या टॉवरमुळे इतरही कंपनीची मोबाइल सेवाही सोबत अडचणीत येणार आहे.
महाडमध्ये १७ मोबाइल टॉवरला ठोकणार सील
By admin | Published: March 11, 2017 2:18 AM