समुद्रकिनारी ४० कोटींचे बंधारे

By admin | Published: November 18, 2015 12:50 AM2015-11-18T00:50:35+5:302015-11-18T00:50:35+5:30

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सुमारे ४० कोटी रुपये खर्चून दगडी बंधारा बांधण्याचे काम पतन विभागामार्फत लवकरच हाती घेण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी अडविण्यासाठी

Seaside bundles of 40 crores | समुद्रकिनारी ४० कोटींचे बंधारे

समुद्रकिनारी ४० कोटींचे बंधारे

Next

- आविष्कार देसाई,  अलिबाग
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सुमारे ४० कोटी रुपये खर्चून दगडी बंधारा बांधण्याचे काम पतन विभागामार्फत लवकरच हाती घेण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी अडविण्यासाठी तसेच पर्यटकांच्या सुविधेसाठीही त्याचा वापर करता येणार आहे. दिवेआगर हे सांसद आदर्श ग्राम म्हणून गणले जात असतानाच पर्यटन वृध्दीने तालुक्याचा आर्थिक कायापालट करण्यास हे बंधारे मैलाचे दगड ठरण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्याला लाभलेले विस्तृत समुद्र किनारे आणि तेथील नारळी-पोफळीच्या बागांनी निसर्गाचे सौंदर्य आणखीन खुलून दिसते. अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्याला विस्तृत समुद्र किनारे लाभले असल्याने पर्यटकांना नेहमीच ते आकर्षित करीत आले आहेत.
तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिवेआगरच्या रूपनारायण मंदिराला नवे रूप दिले होते. त्याचप्रमाणे श्रीवर्धन समुद्र किनारी कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले आहे. या सोयी-सुविधांमुळे येथील पर्यटन व्यवसायाला चांगलीच झळाळी प्राप्त झाली. अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी लोकसभेच्या निवडणुकीत तटकरेंचा पराभव केला होता. दिवेआगर हे गाव आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे. त्यामुळे तटकरेंनी विकास केला त्याहीपेक्षा जास्त विकास करण्यावर गीतेंचा भर राहिल्यास तो स्थानिकांच्या पथ्यावर पडणाराच आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर गीतेंनी दिवेआगरच्या समुद्र किनारी भेट दिली होती. त्यावेळी तेथील काही दगडी बंधारे तुटलेले, सरकलेले दिसून आले. या बंधाऱ्यांची तातडीने चांगली निर्मिती करावी यासाठी प्रयत्न सुरु केले. पतन विभागाने येथील समुद्र किनाऱ्यांची पाहणी केली. सुमारे चार किलोमीटरचे बंधारे निर्माण करण्याची गरज असल्याचा अहवाल पतन विभागाने दिला. यासाठी ४० कोटी रुपये खर्च येणार आहे.
समुद्र किनाऱ्यांच्या बंधाऱ्याचे काम पूर्वी पतन विभाग करीत होते. दरम्यानच्या कालावधीत १ एप्रिल २०११ ला हे काम मेरीटाईम बोर्डाकडे देण्यात आले होते. सरकारने २५ मे २०१५ ला हे काम पुन्हा पतन विभागाकडे वर्ग करण्याचे जाहीर केल्याचे पतन उपअभियंता विजय जावीर यांनी सांगितले.

१० कोटी रुपये खर्च
पहिल्या टप्प्यामध्ये दिवेआगर येथील एक हजार २५० मीटरचा बंधारा बांधण्यासाठी १० कोटी रुपये खर्च येणार आहे. उर्वरित कामासाठी आणखीन ३० कोटी रुपयांची गरज लागणार असल्याचे पतन उपअभियंता विजय जावीर यांनी सांगितले.

निधीची तरतूद लवकर गरजेची
येथील बंधारे लवकरच निर्माण झाल्याने समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण होऊन ते बंधारे पर्यटकांच्या सुविधेसाठीही वापरता येणार आहेत. यासाठी सरकारने निधीची तरतूद लवकर करणे गरजेचे असल्याचे येथील स्थानिक सिध्देश शिलकर यांनी सांगितले.

सरकारकडे निधीची कमतरता असल्याने बंधाऱ्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. बंधाऱ्यांमुळे समुद्राचे पाणी अडविले जाणार आहेच तसेच त्या बंधाऱ्यांचा पर्यटकांनाही वापर करता येणार आहे. त्यामुळे पर्यटन वृध्दीसाठी ते पोषक आहे.
- अनंत गीते, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री

Web Title: Seaside bundles of 40 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.