ग्राहक नसल्याने यंदाचा हंगाम गेला; आमच्यावर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:23 AM2020-08-12T00:23:33+5:302020-08-12T00:23:44+5:30
रीना राजपूरकर यांनी मांडली व्यथा; गोकुळाष्टळी असूनही केवळ दोनच मटक्यांची विक्री
आगरदांडा : आज गोकुळाष्टमीचा दिवस असूनही सकाळपासून ग्राहक नाही, परंतु दुपारच्या दरम्यान एक-दोन मटकी विकली गेली, तर माझे सहकारी म्हसळकर यांचे एकही मटके विकले गेले नाही. या व्यवसायात मेहनत जास्त आणि कमाई कमी असते. एक मटकी बनविण्यासाठी साधारण २० रुपये खर्च होतो. मटकी तयार झाल्यावर आम्ही ही मटकी बाजारात आणून २५ रुपयांना विक्री करत असतो, परंतु ग्राहक नसल्याने यंदाचा हंगाम गेल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे, अशी व्यथा मटकी विके्रते रीना रूपेश राजपुरकर यांनी ‘लोकमत’जवळ मांडली.
गोकुळाष्टमीचा सण दरवर्षी शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी घेतल्याने त्याचा फटका मटकी विक्रे ते व कुंभारांना बसला आहे. गोकुळाष्टमीचा दिवस उजडला, तरी दहीहंडीसाठी मटकी घ्यायला मुरुड बाजारपेठेत ग्राहकांच नसल्याने या विक्रेत्यांवर उपासमारीची पाळी येणार आहे. मुरुडमधील कुंभार वाड्यात दरवर्षी दहीहंडीसाठी मडकी बनविली जातात. आज त्यांच्याकडे शेकडो मडकी तयार आहेत. मात्र, कोरोनामुळे दहीहंडी उत्सवाला बंदी असल्याने उत्सवकर्त्यांनी मटकी घेण्यासाठी पाठ फिरविल्याने मटकी विके्रत्यांना हजारो रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे राज्यसरकाराने आमच्या समाजाकडे लक्ष देऊन भरपाई द्यावी, अशी मागणी मुरुड कुंभारवाड्यातील रिना रूपेश राजपूरकर यांनी केली आहे.
गोकुळाष्टमी हा उत्सव मोठ्या थाटा सर्वत्र साजरा केला जातो. मंदिरातून आरास केली जाते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा केला जातो. भजन, पूजन, कीर्तन इत्यादी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. गोकुळाष्टमीचा उपवास हा त्या दिवशी सोडला जात नाही, तर तो दुसऱ्या दिवशी सोडतात. दुसºया दिवशी शहरात, गावा-गावांत, चौका-चौकांत दहीहंडी लावली जाते. कृष्ण नामाच्या गजरात ती फोडली जाते. आनंदोत्सव साजरा केला जातो.
बाजारपेठेतील हजारो रुपयांची उलाढाल ठप्प
श्रीकृष्ण जन्म उत्सवाच्या दिवशी बाजारपेठेत हजारो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, या कोरोनामुळे सर्वांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. करोनाचे संकट असल्याने यंदा फक्त श्रीकृष्ण जन्मकाळ फक्त पाच जणांच्या उपस्थित साध्या पद्धतीने करण्याचे ठरविले आहे.
दुसºया दिवशी होणारा गोपाळकाला साजरा न करण्याची संयमी भूमिका घेऊन करोनाला आळा घालू या, असे आवाहन दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष अच्युत पोतदार यांनी केले आहे. यंदा हिरमोड झाला, तरी पुढच्या वर्षी दणक्यात दहीहंडी उत्सव साजरा करू, असेही अच्युत पोतदार म्हटले आहे.