उरण : जेएनपीटी बंदराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लावण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. या बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे बंदराची सुरक्षाच धोक्यात येण्याची शक्यता पोलीस, सुरक्षारक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.जेएनपीटीत विविध प्रकारचे विविध ठिकाणी ७१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पॅरॅमीटर रस्ते, जेएनपीटी बंदर, जीटीआय टर्मिनल, बर्थ, लॅण्डिंग जेट्टी, सेट्रल गेट, साउथ गेट, नार्थ गेट, कंट्रोल रूम आदी बंदराच्या आतील आणि बाहेरील महत्त्वाच्या ठिकाणाचा यामध्ये समावेश आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चुकीच्या गोष्टी घडण्याला पायबंद घालण्यास मदत होत असते. शिवाय बंदराच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातूनही सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयित हालचाली, अनुचित गैरप्रकाराकडेही सुरक्षा यंत्रणेला लक्ष पुरविणे सोपे जाते. याच हेतूने जेएनपीटीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामध्ये पीटीझेड कॅमेरा, पीटीझेड वाय-फाय, पीटीझेड थर्मल आदी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा समावेश आहे. बंद पडलेल्या कॅमेऱ्यांमुळे बंदराची सुरक्षाच धोक्यात येण्याची भीतीही पोलीस, सुरक्षा रक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
सीसीटीव्हीमुळे बाह्य परिसराच्या सुरक्षिततेची पाहाणी करणे शक्य होते, तसेच तपास कामातही मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. मात्र, बंदराबाहेरील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीसाठी जेएनपीटी, तसेच नवीमुंबई पोलीस आयुक्तालयात होणाऱ्या प्रत्येक बैठकीत याबाबत चर्चा होऊन मागणी केली जात आहे.- जगदिश शेलकर, पोलीस निरीक्षक, न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभाग.