माणगाव एमआयडीसीत सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:18 AM2019-11-22T00:18:40+5:302019-11-22T00:18:47+5:30

स्थानिकांमध्ये नाराजी; संबंधित यंत्रणेने अधिक सक्षम राहण्याची गरज

Security raises confidence in Mangaon MIDC | माणगाव एमआयडीसीत सुरक्षा रामभरोसे

माणगाव एमआयडीसीत सुरक्षा रामभरोसे

googlenewsNext

- गिरीश गोरेगावकर 

माणगाव : माणगाव तालुक्यातील विळेभागाडमधील औद्योगिक क्षेत्रामध्ये बलाढ्य कंपन्या अस्तित्वात आहेत. कंपन्यांमुळे स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असला, तरी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अद्यापही राम भरोसेच असल्याचे नुकत्याच झालेल्या क्रिप्टझो कंपनीतील स्फोटामुळे स्पष्ट झाले आहे. कंपन्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणांचे बोटचेपे धोरण आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष हेच स्थानिकांच्या सुरक्षा आणि विकासाला मारक ठरत आहे. त्यामुळे कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी अधिक सक्षम राहण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा क्रिप्टझो सारखे स्फोट होतच राहतील, असे चित्र आहे.

माणगाव तालुक्यातील विळेभागाड परिसरातील विविध कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे भंगार महिन्याला निघत असते. हे भंगार घेण्यासाठीच लोकप्रतिनिधी आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयाची चढाओढ असल्याचे सातत्याने दिसून येते. स्थानिकांची सुरक्षितता, स्थानिकांसाठी रोजगाराची उपलब्धता तसेच औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना पुरवण्यात येणाºया सुविधांबाबत कोणीच जागरूक नसल्याने याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.

माणगाव तालुक्यातील विळेभागाड येथील हजारो एकरवर औद्योगिक वसाहत प्रस्थापित झाली आहे; पण यासाठी आवश्यक पोलीस चौकी, अग्निशामक दल, आरोग्य केंद्र, एमआयडीसी कार्यालय, प्रदूषण महामंडळ कार्यालय, अशा मूलभूत सुविधांची गरज आहे. तसेच संबंधित यंत्रेणेमार्फत सातत्याने कंपन्यांचा सुरक्षा आढावा घेणे याबाबींकडे लोक प्रतिनिधींकडून लक्ष दिले जात नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. स्थानिकांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

एमआयाडीसीची स्थापना होऊन सुमारे १० वर्षांचा कालावधी लोटला आहे. या ठिकाणी १७५ हून अधिक कंपन्या आल्या. त्यांनी या ठिकाणी प्लॉटही घेतले; पण आज या ठिकाणी बोटावर मोजता येतील इतक्याच कंपन्या सुरू आहेत. यात आशिया खंडातील सर्वात मोठ्या प्रमाणात स्टील बनवणारी पॉस्को कंपनी, महाराष्ट्र सीमलेस, आयनोक्स, यूनिटी फोर्जिग, टेन कन्स्ट्रक्शन अन्य अशा छोट्या कंपन्या आज सुरू आहेत; परंतु या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाड एमआयडीसीचे कार्यालय व महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे प्रभारी कार्यालय आहे. या कार्यालयातील अधिकाऱ्यांना इथे येण्यासाठी ५० कि.मी. अंतर आहे. त्यामुळे एखादी घटना घडली तर अग्निशामक दल व इतर प्रणालीची गरज भासल्यास किती वेळ जाईल? तसेच नियमितपणे या कंपन्यांवर संबंधित यंत्रणांचे लक्ष कसे राहील हा प्रश्न आहे. सद्यस्थितीत महाड विभागाचे नियंत्रण ठेवणारे दोन्ही विभागचे अधिकारी कंपनी प्रशासनास जास्तच साहाय्य करीत असल्याची चर्चा आहे. यंत्रणांचे व्यवस्थित लक्ष असते तर क्रि प्टझो कंपनीतील दुर्घटना होऊन १८ कामगार होरपळले नसते. आता घटना घडल्यानंतर कंपनी बंद करण्याचे निर्देश प्रदूषण मंडळाने दिले आहेत. वेळीच कंपन्यांच्या कारभारावर लक्ष ठवले असते, तर कदाचित क्रिप्टझोमधील स्फोट झाला नसता.

क्रिप्टझो कंपनीस परवानगी फेब्रुवारी २०१९ ची आसताना त्या कंपनीस लाइट आणि पाणीपुरवठा एवढी वर्षे महाराष्ट्र औद्योगिक मंडळाकडून कसा मिळाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील दोन वर्षांपासून पॉस्को कंपनीचे वेस्टेज पाणी येथील नदीत जाऊन नदीचे पाणी दूषित होत आहे. ग्रामस्थांनी ही बाब निदर्शनास आणली होती. मात्र, कंपनीवर कोणतीही करवाई झाली नाही. त्यामुळे या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आपली पोळी न भाजता एमआयडीसीमध्ये आवश्यक सुविधा कशा येतील, कामगार, गावाची सुरिक्षतता कशी राहील यावर लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चार ते पाच कंपन्या चालू आहेत, जास्त प्रदूषण करणारे प्रोजेक्ट विळेभागाड औद्योगिक क्षेत्रात नाहीत. भारत कार्बन व आॅइल इंडस्ट्रीज या कंपन्या हवेचे प्रदूषण करीत आहेत, याबाबत कंपन्यांना अंतरिम निर्देश दिले आहेत. तसेच आताच झालेल्या क्रिप्टझो कंपनीत स्फोट प्रकरणात कारखाना बंदचे निर्देश दिले आहेत. येथील ग्रामस्थांनी पॉस्को कंपनी पाणी दूषित करीत असल्याचे दर्शविले आसता निर्देश देऊन कंपनीतकंपाउंडच्या आतील भागात बांधकाम करून पाणी अडवण्यास सांगितले.
- सागर आवटी, उपविभागीय अधिकारी, प्रदूषण महामंडळ, महाड

विळेभागाड औद्योगिक क्षेत्रात ४६५ इंडस्ट्रिअल प्लॉट, १२० कमर्शियल व २५ प्लॉट प्रकल्पग्रस्तांसाठी आहेत. सुरुवातीला शेकडो कंपन्यांनी प्लॉट घेतले, १७५ प्लॉटमध्ये पाणी कनेक्शन चालू केले. मात्र, आज ३० ते ३५ कंपन्या चालू आहेत. बाकी कंपन्यानी २० टक्के बांधकामे केली आहेत. मोठ्या कंपन्याचा सपोर्ट मिळत नसल्याने कंपन्या काम अर्धवट सोडून जात आहेत. क्रिप्टझो कंपनी ही सुरुवातीस दुसºया नावाने चालू होती, ती शर्मा ग्रुपने हस्तांतर करीत क्रिप्टझो नावाने चालवत होते.
- मनोज कुलकर्णी , डेप्युटी इंजिनीअर, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, महाड

Web Title: Security raises confidence in Mangaon MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.