गाळमुक्त धरण, शिवार योजना लोकसहभागातून; रवींद्र चव्हाण यांचे अधिकाऱ्यांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:18 AM2018-04-19T01:18:33+5:302018-04-19T01:18:33+5:30
नदी, नाले, विहिरी, धरण गाळमुक्त केल्यास पाण्याची समस्या भासणार नाही.
विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासन ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवित आहे. या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात एक अधिकारी नेमण्यात यावा आणि लोकसहभाग जास्तीत जास्त प्रमाणात वाढावा. लोकसहभाग वाढल्यास योजनची कामे लवकरात लवकर होतील. यासाठी शासकीय विभागाच्या कृषी, महसूल आदी विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्गानी प्रत्येक गावाचे नियोजन करून पाण्याच्या व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा, असे आदेश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी येथे दिले आहेत.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना व ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत किसान कल्याण दिवस कार्यशाळेचे आयोजन येथील पी.एन.पी. नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विश्वनाथ वेटकोळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, आत्मा प्रकल्प संचालक पांडुरंग शिगेदार, नांदेड जिल्ह्यातील शेंबोली गावचे सरपंच बाळासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. नियमित कामापेक्षा हे काम वेगळे असून ते नियोजनबद्ध झाल्यास वेगळेच समाधान तुम्हाला मिळणार आहे. जलक्र ांतीच्या कामात सर्वांनी सहभाग घ्यावा व योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात करून घ्यावा, असे आवाहनही चव्हाण यांनी या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाºयांना केले.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा एक भाग म्हणून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शासन राबविण्यता येत आहे. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी यामध्ये लोकांचा सहभाग असणे गरजेचे असून, यासाठी मोठी लोकचळवळ उभी केली पाहिजे. गाळमुक्त धरण योजनेमुळे पाण्याची पातळी वाढते, पाण्याचे स्रोत वाढतात, तसेच काढलेला गाळ शेतकºयांनी शेतामध्ये वापरल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पन्नवाढीसाठी याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नदी, नाले, विहिरी, धरण गाळमुक्त केल्यास पाण्याची समस्या भासणार नाही. या कामासाठी जेसीबीची कमतरता भासत असेल, तर त्याचीही पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या तालुक्यांमध्ये कंपन्या आहेत, त्यांच्याशीही संपर्क साधून त्यांना योजनेत सहभागी करून घ्यावे. पोलादपूर तालुक्यातील १४ गावांमध्ये फ्री वॉटर कप योजना कार्यान्वित करण्यात आल्याचेही सूर्यवंशी यांनी अखेरीस सांगितले.