लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या मागे आरटीओने जप्त केलेल्या वाहनांना अचानक आग लागली. आरसीएफ अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत वाहने जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे अग्नीशमन दलातील जवानांकडून सांगण्यात आले.
शनिवारी दुपारी ही घटना घडली. अचानक वाहनांना लागलेली आग पाहून मांडवा सागरी पोलीस ठाणेतील गोपनीय अंमलदार पोलिस नाईक पाटील यांनी फोनद्वारे आरसीएफ अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानुसार आरसीएफ थळ येथील अग्निशमन दल घटनास्थळी हजर झाले. दलातील अग्निशमन सुरक्षा अधिकारी प्रशांत घरत , वरीष्ठ अग्निशमन प्रचालक रामचंद्र थळे व संजय म्हात्रे, चालक किशोर म्हात्रे, अग्निशामक सौरभ शोभणे, अजित कांबळे व हर्षवर्धन वाघमारे यांनी पाणी व फोमचा वापर करुन सदर ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. या आकस्मिक अग्नीची नोंद मांडवा सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.