मधुकर ठाकूर
उरण - तालुक्यातील गव्हाण -बेलपाडा वनविभागाच्या हद्दीतुन विनापरवाना डेब्रिजची वाहतूक करणाऱ्या मुंबईतील १६ डंपर उरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत जप्त केले आहेत. उरण-पनवेल परिसरातील अनेक ठिकाणी मुंबईती डेब्रिज मोठ्या प्रमाणावर आणून कुठेही कधीही टाकले जात आहे.
डेब्रिज टाकण्याचे प्रकार मागील दीड दोन वर्षांपासून सुरू आहे. याबाबत अनेक ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी तहसिलपासून, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि पर्यावरण विभागाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र कारवाईसाठी संबंधित सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परस्परांकडे बोटे दाखवून दुर्लक्ष करीत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांच्या बोटचेपी धोरणामुळे मात्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी (९) रात्रीच्या सुमारास गव्हाण -बेलपाडा वनविभागाच्या हद्दीतून विनापरवाना डेब्रिजची वाहतूक केली जात असल्याची माहिती उरण वनविभागाचे वनक्षेत्रपाल नथुराम कोकरे यांना मिळाली होती.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास पथकासह जाऊन पाहणी केली असता वनविभागाच्या हद्दीतुन विनापरवाना डेब्रिजची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले होते. वनविभागाच्या हद्दीतून विनापरवाना वाहतूक करणाऱ्या १६ डंपर अडवून कारवाई करत गुरुवारी रात्री जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व डंपर मुंबईतुन डेब्रिज घेऊन आले होते. वनविभागाच्या हद्दीतून विनापरवाना वाहतूक केल्यानेच कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उरण वनविभागाचे वनक्षेत्रपाल नथुराम कोकरे यांनी दिली.