त्रस्त ठेवीदारांचा आत्मदहनाचा इशारा

By admin | Published: March 7, 2017 02:35 AM2017-03-07T02:35:06+5:302017-03-07T02:35:06+5:30

रायगडच्या जिल्हाधिकारी तथा पेण अर्बन बँक घोटाळा विशेष कृती समितीच्या अध्यक्षा शीतल तेली-उगले यांना सोमवारी दिला.

Self-hit warning of distressed depositors | त्रस्त ठेवीदारांचा आत्मदहनाचा इशारा

त्रस्त ठेवीदारांचा आत्मदहनाचा इशारा

Next

जयंत धुळप,
अलिबाग- आता कोणतीही पूर्वकल्पना न देता आमच्यापैकी २० वयोवृद्ध त्रस्त ठेवीदार जिल्हाधिकारी कार्यालय, आरबीआय कार्यालय आणि मुंबईत मंत्रालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा रायगडच्या जिल्हाधिकारी तथा पेण अर्बन बँक घोटाळा विशेष कृती समितीच्या अध्यक्षा शीतल तेली-उगले यांना सोमवारी दिला. पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे आंदोलन आता एका वेगळ्या वळणावर येवून पोहोचले आहे.
पेण अर्बन बँक घोटाळ्याचा तपास पूर्ण करून, ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचे पैसे व्याजासह परत देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असताना, रायगडच्या जिल्हाधिकारी तथा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नियुक्त पेण अर्बन बँक घोटाळा विशेष कृ ती समितीच्या अध्यक्षा शीतल तेली-उगले यांच्याकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गेल्या साडेसहा वर्षांपासून ठेवीदार शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकाऱ्यांकडे येत असताना शासनस्तरावर कोणतीही कार्यवाही होत नाही, यामुळे त्रस्त झालेल्या वयोवृद्ध ठेवीदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांचीही भेट घेवून हा इशारा दिला असल्याची माहिती ठेवीदारांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
राष्ट्रीयकृत बँका असताना पेण अर्बन बँकेत तुम्ही पैसे कशाला ठेवले,असा प्रश्न या ठेवीदारांना जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी केला आणि ठेवीदार काहीसे संतप्त झाल्याचे पोयनाड येथील ठेवीदार बी.एम.पाटील यांनी सांगितले. मुळात आम्ही ज्या काळात या बँकेत पैसे ठेवले त्यावेळी राष्ट्रीयकृत बँका आतासारख्या नव्हत्या, त्याचबरोबर शासनाच्या सहकार कायद्यान्वये आणि आरबीआयच्या परवान्यानुसार कार्यरत पेण अर्बन बँकेत आम्ही पैसे ठेवले ही ठेवीदार म्हणून आमची चूक आहे का, असा प्रतिप्रश्न करुन ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निरुत्तर केल्याचे पाटील यांनी सांगितले.
पेण तालुक्यातील दादर येथील ठेवीदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पत्नी कांचन म्हात्रे या कॅन्सरच्या रुग्ण आहेत. त्यांच्यावर केमोथेरपीचे उपचार मुंबईतील रुग्णालयात सुरू आहेत. पुढच्या महिन्यात त्यांची कॅन्सरची शस्त्रक्रिया करणे अनिवार्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या शस्त्रक्रियेकरिता मला माझे पैसे मिळणे अत्यावश्यक आहे, परंतु ते मिळत नाहीत, मी काय करू...असा प्रश्न ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केला आहे.
रायगडच्या जिल्हाधिकारी तथा पेण अर्बन बँक घोटाळा विशेष कृती समितीच्या अध्यक्षा शीतल तेली-उगले यांची भेट घेवून त्यांना निर्वाणीचा हा इशारा देणाऱ्या त्रस्त वयोवृद्ध ठेवीदारांमध्ये कर्जत येथील मधुकर गायकवाड, खोपोली येथील चिंतामण पाटील, बंधू साखरे, पोयनाड येथील बी.एम.पाटील, विनायक पाटील, शामला वाघ, नरेश बैकर, पेण येथील ज्ञानेश्वर म्हात्रे, सुरेश भातखंडे,आत्माराम म्हात्रे आदिंचा समावेश होता. आमचा हा निर्णय ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
>विशेष कृती समितीच्या बैठकीस बँकेचे प्रशासक गैरहजर
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलेल्या पेण अर्बन बँक विशेष कृती समितीची गेल्या महिन्यात जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहितेच्या कारणास्तव रद्द करण्यात आलेल्या बैठकीचे आयोजन रायगडच्या जिल्हाधिकारी तथा शासन नियुक्त पेण अर्बन बँक घोटाळा विशेष कृती समितीच्या अध्यक्षा शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली होती, मात्र या बैठकीस पेण अर्बन बँकेवर शासन नियुक्त प्रशासक शरद झरे हेच अनुपस्थित होते.
पनवेल नैना प्रकल्पामधील पेण अर्बन बँकेच्या ३९ मालमत्तांच्या विक्रीची अधिसूचना शासनाने काढली आहे. मात्र त्यांची विक्री प्रक्रिया पूर्ण करून त्यायोगे येणारे ५०० कोटी रुपये बँकेत जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात मोठी दिरंगाई झाल्याचे पेण अर्बन बँक विशेष कृती समितीचे ठेवीदार प्रतिनिधी नरेन जाधव यांनी या बैठकीत लक्षात आणून दिले.
या ३९ मालमत्तांचे २०१४ मध्ये करण्यात आलेले शासकीय मूल्यांकन ४१५ कोटी रुपये होते, तर २०१७ मध्ये केलेल्या फेरमूल्यांकनानुसार ते ५८१ कोटी रुपये झाले असल्याची माहिती यावेळी पेणचे उपनिबंधक (सहकारी संस्था) बी.के.हांडे यांनी दिली. या मालमत्तांच्या विक्रीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता देखील दिली आहे, तर मुंबई उच्च न्यायालयाने या मालमत्तांवरील अंमलबजावणी संचालनालयाचे बोजे उतरवण्याचे आदेश ७ आॅक्टोबर २०१६ रोजी दिले आहेत. अशा परिस्थितीत या मालमत्ताची विक्री करून पैसे बँकेत जमा करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत देणे शक्य आहे, परंतु ही कार्यवाहीच करण्यात येत नसल्याबाबत नरेन जाधव यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. याबाबत कालबद्ध कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी तेली-उगले यांनी सांगितल्याचे जाधव म्हणाले.

Web Title: Self-hit warning of distressed depositors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.