स्वयंभू दक्षिण काशी श्रीक्षेत्र हरिहरेश्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 06:45 AM2017-08-07T06:45:21+5:302017-08-07T06:45:21+5:30
रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे.
जयंत धुळप
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे. या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते. त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्त्वाची स्थाने आहेत. यामुळे श्रावणात येथे मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी असते.
सावित्री नदी श्रीवर्धन तालुक्यात ज्या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते त्या ठिकाणच्या एका किनाºयावर दक्षिण बाजूस मुखाजवळच ‘हरिहरेश्वर’ तर समोरच्या उत्तरेकडील किनाºयावर ‘श्रीवर्धन’ हे गाव वसलेले आहे. नारळी पोफळीच्या किनाºयावरील बागा आणि डोंगराच्या कुशीत हरिहरेश्वर हे तीर्थस्थान आहे. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्र तीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे येथे आहेत. गोकर्ण (कर्नाटक)ते निर्मळ (ठाणे) हा संपूर्ण परिसर श्रीक्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात एकूण १०८ तीर्थस्थाने असली तरी प्रमुख ‘तीर्थ’ हरिहरेश्वरमध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख श्री हरिहरेश्वर माहात्म्य पोथीमध्ये आहे. हरिहर नावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरूप या दोन्हींचा संगम झाला आहे.
हरिहरेश्वराचे देऊळ प्राचीन शिवकालीन असावे असा अंदाज आहे. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार सन १७२३ मध्ये केल्याचे पुरावे आहेत.
येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत. हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे. बळीराजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले,अशी एक आख्यायिका आहे, तर अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा हरिहरेश्वरातील चार स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले,अशी दुसरी आख्यायिका सांगितली जाते.
नारळाच्या किनाºयावरील बागा आणि डोंगराच्या कुशीत हरिहरेश्वर हे तीर्थस्थान आहे. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक, हनुमान चार मंदिरे,समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्र तीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे येथे आहेत.
प्रथम काळभैरवाचे, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन
ार्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे. या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत, त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते.
या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाºया प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील सुमारे दीडशे पायºया खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते.
या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर जुन्या एककाप्रमाणे एक कोस (सुमारे सव्वा किमी)असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात. हरिहेश्वराला केलेला नवस पूर्ण होतो अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे. श्रावणी सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते.
तीनशे वर्षांपूर्वीचे स्वयंभू श्री रसेश्वर शिवलिंग
अलोकमत न्यूज नेटवर्क
मोहोपाडा : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे जाणाºया पराडे-सिद्धेश्वरी रस्त्यावरील पाताळगंगा पुलाजवळ नदीकिनारी श्री रसेश्वर शिवलिंग हे स्वयंभू देवस्थान आहे. हे देवस्थान तीनशे वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज बांधला जात आहे. मंदिरातील मूर्ती ही स्वयंभू असून, मंदिराचे पुरातन काम हे पाषाण दगडाचे आहे. हे मंदिर पूर्वी विश्वेश्वर नावाने ओळखले जायचे, यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार पु. ल. देशपांडे यांनी केल्यानंतर रसेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले. श्रावणात दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी येथे पाहावयास मिळत आहे.
या मंदिराचे कळस पुरातन दगड-गोट्यांचे आहेत. श्री रसेश्वर मंदिरासमोरील स्वयंभू दीपमाळ भंग पावल्याने त्याजागी केरळहून आणलेली दीपमाळ दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधत आहे. या दीपमाळेभोवती काचेचे आवरण देण्यात आले आहे. मंदिराच्या दक्षिणेस हवनकुंड, दोन्ही बाजूस पिंपळवृक्ष असून, मंदिरासमोरच वटवृक्ष आहे. मंदिराच्या मागील बाजूस घाट आहे. उत्तरेस गोमुख असून शिवलिंगासमोर स्वयंभू नंदी व संगमरवरी कासवमूर्ती आहे. तर मागील बाजूस देवीची मूर्ती आहे. मंदिरातील पूजाविधीचा कार्यक्र म पुजारी नटराजन सुब्रह्मण्यम करीत आहेत, तर मंदिरातील देखभालीचे काम रसेश्वर समितीचे दत्तात्रेय जांभळे पाहत आहेत.
श्री रसेश्वर मंदिरात आश्लेषाबळी, भगवतीसेवा, महागणपती हवन, रुद्रएकादशी, वसुधरा, कृष्णपूजा आदी कार्यक्र म पार पडतात. तर दैनंदिन रोज सकाळी शिवलिंग पूजन, अभिषेक, आरती, नैवेद्य आदी कार्यक्र म होतात. येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते. स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होत असून, मंदिराच्या परिसरात अनेकदा नागदेवतेचे दर्शन होत असल्याचे भाविक सांगतात.
श्री रसेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असल्याचे समितीचे सुरेंद्र पावसकर यांनी सांगितले.