अलिबाग : मतदारांमध्ये उत्साह वाढावा म्हणून एक सखी मतदान केंद्र, चार आदर्श मतदान केंद्रे, एक युवा मतदान केंद्र, नऊ महिला संचलित मतदान केंद्रे, तीन युवा संचलित मतदान केंद्रे व तीन दिव्यांगांसाठी विशेष मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या मतदान केंद्रांवर आकर्षक सजावट व रंगसंगती केली होती. तसेच मतदारांमध्ये उत्साह वाढावा म्हणून सेल्फी पाॅईंट उभारण्यात आला होता. त्यामुळे मतदान केंद्रावर नवमतदारांसह ज्येष्ठांचा उत्साह दिसून आला.
अलिबाग शहरातील कोएसो जा.र. ह. कन्या शाळेत सखी मतदान केंद्र होते. येथे पिंक बूथ करण्यात आला होता. या केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोडही पिंक होता. पेणमधील पेण नगरपालिका शाळा, म्हसळ्यातील मराठी शाळा, तर गोरेगावमध्ये जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दिव्यांग संचलित मतदान केंद्र होते. या मतदान केंद्रावर सहा दिव्यांग कर्मचारी आहेत. दिव्यांगांसाठी रेलिंग व व्हीलचेअरची सुविधा दिली होती. मतदारांसाठी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. सुंदर व सुबक अशी रांगोळीही काढण्यात आली होती.
कर्मचाऱ्यांना सर्व सुविधामतदान केंद्रांवर निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे याकरिता मंडप टाकला होता. तसेच येणाऱ्या व जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाश्ता, भोजन, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. तसेच दैनंदिन वापरासाठी अवश्यक असलेल्या वस्तूंचे किटही देण्यात आले होते.