खोपोली - पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे पैसे शासनाने बँकेच्या ताब्यातील १३५ एकर जमिनी विकून परत द्यावेत, तरच या सरकारला ठेवीदार पाठिंबा देतील, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत ठेवीदार हिसका दाखवतील, असा आक्र मक पवित्रा पेण बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष आ. धैर्यशील पाटील यांनी ठेवीदारांच्या जाहीर सभेत घेतला.पेण बँक बंद होऊन आठ वर्षे पूर्ण झाली; परंतु ठेवीदारांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. म्हणून ठेवीदार आक्रमक झाले आहेत. आठ वर्षांत केवळ चार कोटींची वसुली झाली, त्यामुळे खोपोलीत शनिवारी मोर्चा काढण्यात आला. पोलीस निरीक्षक हेगाजे यांना या वेळी शिष्टमंडळाने निवेदन दिले.त्यानंतर लोहाणा सभागृहात आयोजित ठेवीदारांच्या जाहीर सभेत संघर्ष समितीचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, कार्याध्यक्ष नरेन जाधव, माजी आमदार देवेंद्र साटम, हास्य क्लबचे संस्थापक बाबूभाई ओसवाल, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, नगराध्यक्षा सुमन औसरमल, सी. के. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.संघर्ष समितीच्या प्रयत्नांमुळेच ठेवीदारांचे पैसे परत मिळणार असल्याचे बाबूभाई ओसवाल यांनी सांगितले. देवेंद्र साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. नरेन जाधव यांनी बँकेच्या १३५ एकर जमिनी व संचालकांच्या मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे तातडीने देण्याची मागणी शासनाकडे केली.
बँकेच्या ताब्यातील जमिनी विकून ठेवीदारांचे पैसे द्या - धैर्यशील पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 4:37 AM