पुस्तकांमुळे माणसे वाचणेही शिकलो, रायगड जिल्हा ग्रंथोत्सवात परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:31 AM2017-11-24T02:31:00+5:302017-11-24T02:31:18+5:30
अलिबाग : पुस्तक वाचनातून आपण समरसता अनुभवू लागतो. दुसºयाला जाणून घेण्याची हीच प्रक्रिया असते. हे केवळ वाचनातून शक्य होते.
अलिबाग : पुस्तक वाचनातून आपण समरसता अनुभवू लागतो. दुसºयाला जाणून घेण्याची हीच प्रक्रिया असते. हे केवळ वाचनातून शक्य होते. त्यामुळेच पुस्तक वाचता वाचता माणसेही वाचायला शिकलो, ज्याचा फायदा मला जिल्हाधिकारी म्हणून काम करताना होतो अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘ग्रंथांनी मला काय दिले?’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले.
जिल्हा ग्रंथोत्सवाच्या कार्यक्र मात गुरुवारी सकाळी जेएसएम महाविद्यालयात ‘ग्रंथांनी मला काय दिले?’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी हे अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी विचार व्यक्त केले. या वेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी उपस्थित होते.
या परिसंवादात जिल्हा कोषागार अधिकारी मुल्ला म्हणाले की, शासनाचे काम करताना विविध नियमांचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी वाचनाची सवय ही कामी येते. चांगलं वाचन आवश्यक असून वाचनाने आपला दृष्टिकोन बदलतो. आपले विचार अधिक व्यापक झाले. वाचनाने माझी दृष्टी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक झाली. माझा सामाजिक आणि आर्थिक स्तर केवळ वाचनामुळेच वाढला. माझ्या कुटुंबाला असलेला व्यसनाधीनतेचा शापही मी वाचनामुळेच मोडीत काढू शकलो.
अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी वाचनाचा संस्कार आवश्यक आहे. वाचनामुळे माझा धर्म आणि धार्मिकता याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे मला पोलीस विभागात काम करताना मदत होते, असे प्रतिपादन केले. सूत्रसंचालक सुधीर शेठ यांचा महाड येथे राबविण्यात येत असलेल्या पुस्तक बाग उपक्रमाबद्दल जिल्हाधिकाºयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय समारोपात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, लहानपणी वडिलांमुळे वाचनाचा संस्कार घडला. ‘मृत्युंजय’ हा पहिला ग्रंथ वाचून मी भारावून गेलो. त्यासाठी लेखक शिवाजी सावंत यांना पत्रही लिहिले. त्यांनीही मला उत्तर दिले. ते पत्र मी जपून ठेवले आहे. पुढे अधिकारी झाल्यावर मला शिवाजी सावंतांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांना ते पत्र दाखवले. आपल्या आयुष्यात शिवाजी सावंत आणि कुसुमाग्रज यांनी त्यांच्या स्वाक्षरीसह दिलेले पुस्तक हाच अनमोल ठेवा आहे.
विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्र वाटप
याच कार्यक्र मात वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्रे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ उपस्थित होते.