मधुकर ठाकूर,उरण : आवरे येथील प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी स्थापन केलेल्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या प्रयत्नांतून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात नवीन महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे.आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स' शाखेच्या विभागासाठी मुंबई विद्यापीठामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.यामुळे या भागातील गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दालन खुले होणार आहे.
शिक्षणाचे महत्त्व ओळखून प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी १९९२ रोजी या विभागात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरु केली. उरण परिसरातील ग्रामीण भागातील गरीब,गरजु शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी वरिष्ठ महाविद्यालय व्हावे अशी त्यांची इच्छा होती. कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स' या नावाने नवीन वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यास १५ फेब्रुवारी २०२४ रोजी शासनाने मंजूरी दिली आहे.प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे हीच खरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला श्रद्धांजली आहे अशा शब्दांत संस्थेचे विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांनी भावना व्यक्त केल्या.
या नव्याने सुरू होणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे उरण, पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाचा शिक्षणाचा मोठा फायदा होणार आहे.ग्रामीण भागात सुरु होत असलेल्या या महाविद्यालयामुळे गरीब, कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले असून ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.