अलिबाग : पाली-सुधागड येथील ग.बा. वडेर हायस्कूलमध्ये १९६१ मध्ये शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केलेले ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व साहित्यिक प्रा. शं.श्री. पुराणिक (८३) यांचे बुधवारी सकाळी ९.१५ वाजता पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. शं.श्री. पुराणिक यांच्या इच्छेनुसार त्यांच्यावर तळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.पुराणिक हे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जात असत. इंग्रजी विषयावर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. नाटकातील संवाद, स्वगते ते तोंडपाठ सांगू शकत. संस्कृत या विषयात बी.ए. आणि एम.ए. करून पालीसारख्या गावात ग.बा. वडेर हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून १९६१-६२ साली नोकरीला सुरुवात केली. ग.प्र. प्रधान सरांच्या सूचनेनुसार त्यांनी एम.ए. इंग्रजी करून वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. चिपळूण, खेड, अलिबाग येथे काही काळ नोकरी करून ते चाळीसगाव येथे स्थिरावले. प्राध्यापक म्हणून त्यांनी ३३ वर्षे अध्यापनाचे काम केले. वाचन आणि लेखनाची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांचे काम संशोधनात्मक असे होते. त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर आठ पुस्तके लिहून तयार आहेत, मात्र ती सर्व अप्रकाशित आहेत. त्यांच्या पश्चात पाली-सुधागड येथील पालीवाला कॉलेजचे उप प्राचार्य प्रा.सुधीर पुराणिक, उमेश पुराणिक ही मुले, कन्या मृणाल, स्नुषा प्रा.अंजली पुराणिक व नातवंडे असा मोठा परिवार आहे. (विशेष प्रतिनिधी)पुराणिक यांची ग्रंथसंपदापेशवा पहिला बाजीराव -पूर्वार्ध (१९९९), पेशवा पहिला बाजीराव - उत्तरार्ध (२०००), विश्वनाथ काशिनाथ राजवाडे - व्यक्तित्व, कर्तृत्व व विचार (१९८९), रामदास (१९९६), रियासतकार (२००२), रियासतकार गो.स.सरदेसाई (२०१० - महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला), मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - छत्रपती संभाजी (१९८१), मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - छत्रपती राजाराम (काळ प्रकाशन, १९८२), तुळाजी आंग्रे - एक विजयदुर्ग (१९९९), उत्तरायण - (१९४७/ १९९१),११. विष्णुशास्त्री (१९९२, श्रीपाद महादेव माटे - व्यक्तिदर्शन (१९८६), बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा (२००७), य.न. केळकर एक ऐतिहासिक पोवाडा (२००२), इंग्लिश वाङ्मयातील वाचस्पती - भाग १ (२०११), पेशवा दुसरा बाजीराव (२०११/ २०१४)
ज्येष्ठ इतिहास संशोधक श. श्री. पुराणिक यांचे निधन
By admin | Published: July 28, 2016 1:07 AM