खासगी रुग्णालयांत नोंदणीसाठी ज्येष्ठांचे हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:08 AM2021-03-03T00:08:36+5:302021-03-03T00:08:50+5:30
पनवेलमधील अवस्था : कोरोना लसीकरणास अडथळा कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वर्ष असलेल्या विविध व्याधी जडलेल्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतदेखील लस देण्यात येत आहे. मात्र खासगी रुग्णालयांसोबत शासनाचा योग्य समन्वय नसल्याने दुसऱ्या दिवशी २ मार्च रोजी पनवेलमध्ये बऱ्याचशा खासगी रुग्णालयांत ज्येष्ठांना लस घेता आली नाही. दिवसाअखेर २१० ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे .
लसीकरणावेळी ऑनलाइन ॲपमध्ये गोंधळ कायम आहे. तसेच खासगी रुग्णालयासोबत कोणताही करार झाला नसल्याने तेथे लसीकरणास आणखी अवधी लागण्याची शक्यता आहे.
श्री सत्यसाई संजीवनी सेंटर ऑफ चाइल्ड हार्ट केअर खारघर, डॉक्टर पटवर्धन स्मृती रुग्णालय, पनवेल हॉस्पिटल - उरण नाका, उन्नती हॉस्पिटल, लाइफ लाइन हॉस्पिटल, बिरमोळे हॉस्पिटल, श्री साई मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, आशा मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल कळंबोली, येरळा मेडिकल कॉलेज, खारघर आदी खासगी रुग्णालयांत २५० रुपयांत हे लसीकरण करता येणार आहे.
कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी अडथळे येत आहेत. पालिकेकडून एकाही नागरी आरोग्य केंद्रावर ही सुविधा उपलब्ध नाही. येरळा मेडिकल कॉलेज, टाटा रुग्णालय, खारघर येथे दुसऱ्या दिवशी लसीकरण करण्यात आले. तांत्रिक अडचणीमुळे अनेक ज्येष्ठांना लस न घेताच घरी परतावे
लागले.
पनवेल परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी पनवेलवरून खारघर शहर गाठावे लागत आहे. विशेषतः पनवेलमधील ज्येष्ठ नागरिकांना हा त्रास सर्वात जास्त झाला. रजिस्ट्रेशनमध्ये अडथळे येत असल्याने मंगळवारी लस घेता आली नसल्याचे राजाराम पाटील (६३) या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत २१० ज्येष्ठ नागरिकांनी ही लस घेतल्याची माहिती पालिकेमार्फत देण्यात आली.
लसीकरणासाठी असलेल्या कोविन ॲपवर तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणात अडचण निर्माण होत आहे. ही समस्या सर्वत्रच आहे. आम्ही जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर लस देता येईल याकरिता प्रयत्नशील आहोत.
-डॉ आनंद गोसावी,
वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका
खासगी रुग्णालयात लसीकरण होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना भरउन्हात रिकाम्या हाती परतावे लागत आहे. लसीकरणाबाबत गोंधळ कायम असल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खासगी रुग्णालयांसोबत समन्वय नाही
खासगी रुग्णालयांसोबत पालिकेचा समन्वयाचा अभाव असल्याने दुसऱ्या दिवशीही बहुतांशी खासगी रुग्णालयांत लसीकरण झाले नाही. लस ठेवण्यासाठी स्टोरेज सिस्टीम, आवश्यक मनुष्यबळ आदी प्रश्न खासगी रुग्णालय प्रशासनाला सतावत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ट्रेनिंगही या रुग्णालयांना दिलेली नाही.