लोकमत न्यूज नेटवर्क, माणगाव : माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या १४ वर्षीय शाळकरी मुलाला उपचाराविनाच घरी पाठविल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. म्हसळा तालुक्यातील घुम गावात राहणाऱ्या या मृत मुलाचे नाव गर्वांग दिनेश गायकर असे असून, उपचाराअभावीच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
गर्वांगच्या पायावर केसपुळी आल्याने शुक्रवारी त्याला म्हसळा ग्रामीण रुग्णात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला ताप आल्याने शनिवारी, ५ एप्रिलला रात्री त्याला १०८ रुग्णवाहिकेच्या साह्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार न करता त्याला परत घरी पाठविण्यात आले. दुसऱ्या दिवशी गर्वांगचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
कठोर कारवाईची मागणीगर्वांग याच्या मृत्यूला रुग्णालयातील डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणानंतर शिवसेना आक्रमक झाली असून, त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे
डॉ. सावंत व डॉ. राप्ते यांनी रुग्णाला तपासल्यानंतर तो व्यवस्थित असल्याने त्याला घरी पाठविले. वरिष्ठांकडून यासंदर्भात कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून मुलाला आणि त्याच्या आई-वडिलांना १०० टक्के न्याय मिळेल. डॉ. महेश मेहता, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, माणगाव
उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे रुग्णाला तपासले असता ॲडमिट करण्याची आवश्यकता वाटली नाही, असे तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोणतीही रक्त तपासणी न करता तापाच्या गोळ्या देऊन रुग्णाला घरी पाठवण्यात आले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल. डॉ. किरण शिंदे, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक, अलिबाग (रायगड)