सर्व्हर डाऊनमुळे कोट्यवधींचा फटका
By admin | Published: May 16, 2017 12:01 AM2017-05-16T00:01:38+5:302017-05-16T00:01:38+5:30
रायगड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सर्व्हर बंद पडल्याने कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची दस्तनोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करणारे
आविष्कार देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सर्व्हर बंद पडल्याने कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची दस्तनोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करणारे आणि विकणारे यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवृत्तिवेतन, बिल पोर्टल, वेतनिका, कोषवाहिनी, अर्थवाहिनी यांनाही या सर्व्हरचा फटका बसला आहे.
सोमवारी सरकारच्या सर्व्हरने काही अंशी वेग पकडल्याने व्यवहारांना संथ गतीने सुरुवात झाली. मेसर्स टाटा कम्युनिकेशन यांच्या डाटा सेंटरमध्ये नवीन पायाभूत सुविधांसह अन्यबाबींची प्रतिष्ठापना करण्यासाठी ‘डाऊन टाईम’ घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ६ मे २०१७ सायंकाळी सहा वाजल्यापासून ते ११ मे २०१७ सकाळी दहा वाजेपर्यंत तर, दुसऱ्या टप्प्यात शुक्रवार १२ मे २०१७ सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रविवार १४ मे २०१७ सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘वेळ’ घेण्यात आला होता. त्याबाबतचे एक परिपत्रकच ३ मे २०१७ रोजी सरकारने काढले होते. सर्व्हर बंद असल्याने बिम्स प्रणालीद्वारे प्राधिकारपत्र काढणे, ग्रास प्रणालीद्वारे सरकारी खाती जमा करणे, सेवार्थ प्रणालीद्वारे देयके तयार करणे, निवृत्तिवेतन प्रकरणे तयार करणे, बिल पोर्टलद्वारे देयके तयार करणे, अतितातडीच्या सेवा वगळता कोषागारात देयके सादर करणे अशा सेवांना ब्रेक लागला होता.
पनवेल, उरण, खालापूर, पेण आणि अलिबाग तालुक्यात मोठ्या संख्येने विकासकात्मक योजना कार्यान्वित झाल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार, जमीन, दुकान, घर, फ्लॅट भाड्याने देणे यांचा समावेश होतो. या व्यवहारांचा थेट संबंध हा सह जिल्हा निबंधक व मुद्रांक अधिकारी कार्यालयाशी येतो. मात्र सर्व्हरचे अपग्रेडेशनचे काम सुरू होते. त्यामुळे विविध प्रकारची सुमारे ७० प्रकरणांची दस्तनोंदणी रखडली होती. या दस्तनोंदणीचा आर्थिक व्यवहार हा कोट्यवधी रुपयांच्या घरातील आहे. त्यामुळे खरेदी-विक्री करणारे दोघेही अडचणीत आले होते. काहींना फ्लॅटचा ताबाही घेता आला नसल्याची चर्चा कार्यालय परिसरात होत होती.