कर्जत : जगात सर्वात पवित्र गोष्ट म्हणजे ज्ञान. आईबापाची सेवा जो करतो त्याने देवाला गेलेच पाहिजे, असे नाही. स्वत:चा धर्म पाळणे हीच देवाची पूजा. हल्ली ८० टक्के कीर्तनकार मंडळी ५० टक्के आई व ५० टक्के बाबांवर कीर्तन देतात; परंतु त्यांचे आईबाप कोणत्या वृद्धाश्रमात आहेत ते त्यांनी आधी पाहावे. देव पाहू नका, देव होण्याचा प्रयत्न करा, असे मार्गदर्शन ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून केले.कर्जत तालुक्यातील हलीवली येथील भैरवनाथ मंदिरामधील काकड आरतीच्या सांगता सोहळ्यानिमित्ताने विजय हांडे आणि उपसरपंच सारिका हांडे यांनी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. शिवभोळा चक्रवर्ती..... या एकनाथ महाराजांच्या अभंगावर कीर्तन सादर करताना इंदुरीकर यांनी, १५ वर्षांपूर्वी मुलींची लग्न झाली की, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ म्हणजे आता फक्त माहेरपणाचा संबंध असे. दिली तेथे मेली असे होते. एखाद दिवशी बाप मुलीकडे गेल्यास गुपचूप तिला पैसे देत असे, तिच्याशी मोकळ्या मनाने बोलण्याचीही चोरी होती. आता काळ बदललाय मुलीचे लग्न झाले की, एखादा महिना तेथे राहून बघ, नाहीतर जावयांनाच इकडे घेऊन ये, एखादी टपरी टाकून देऊ, असे म्हणणाºया आया तयार झाल्या आहेत.दररोज फोन करून काही ना बाही शिकवत असतात. हे थांबले पाहिजे, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सल्ला महिलांना देऊन त्यांनी, महिलांच्या बाजूने कायदे आहेत. त्याचा गैरफायदा घेतला जातो. याबद्दल अनेक उदाहरणे दिली. परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.याप्रसंगी हरिपाठ ह.भ.प. निवृत्ती महाराज शिंदे आणि ह.भ.प. दत्तात्रेय श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ करण्यात आला. या वेळी रायगडभूषण बडेकर यांचा सत्कार इंदुरीकर यांच्या हस्ते करण्यात आला.