कर्जत : मध्य रेल्वे प्रशासन जर का कर्जत रेल्वे स्थानकात भिसेगावकडील असलेल्या तिकीट खिडकीची वेळ वाढवू शकत नसतील तर निदान त्या ठिकाणी स्मार्ट कार्ड मशिन तरी बसवावे, अशी मागणी कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने पंकज ओसवाल यांना कर्जत येथे भिसेगाव बाजूला लवकरच स्मार्ट कार्ड मशिन बसविण्यात येणार असून त्या संदर्भात टेंडरची प्रक्रिया सुरू असून भिसेगावसाठी स्मार्ट कार्ड मशिन खरेदी करण्यात येणार असल्याचे लेखी कळविले आहे.कर्जत रेल्वे स्थानकातील भिसेगाव दिशेकडील तिकीट खिडकी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंतच सुरू असते. त्यानंतर तिकीट काढण्यासाठी रेल्वे प्रवाशांना खूपच शारीरिक त्रास करून मुख्य तिकीट खिडकीपर्यंत यावे लागते. भिसेगावकडील तिकीट खिडकी साडेचार वाजताच बंद करीत असल्यामुळे शासकीय कर्मचारी व कॉलेज विद्यार्थी व इतर शेकडो प्रवासी जे एसटीने येत असतात त्यांना खूपच त्रास होत असे. तसेच बसने भिसेगावकडे शेकडो प्रवासी उतरत असतात व रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकीट काढण्याकरिता भिसेगावकडे असलेल्या तिकीट खिडकीकडे येतात, परंतु साडेचारनंतर तिकीट खिडकी बंद असल्यामुळे त्यांना मुख्य खिडकीकडे यावे लागते. भिसेगावची खिडकी व मुख्य खिडकीमध्ये अंतर असल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यातच प्रवाशांकडे सामान असले किंवा वयोवृद्ध, लहान मुले असल्यास त्यांना भिसेगाव येथील तिकीट खिडकी साडेचार वाजताच बंद करीत असल्यामुळे खूपच त्रास सहन करावा लागतो. भिसेगावकडील तिकीट खिडकीची वेळ वाढवायची नसेल तर निदान त्या ठिकाणी स्मार्ट कार्ड मशिन तरी बसवावे, असे ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनास सूचित केले होते. फलाटक्रमांक एकच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेलाही एक नवीन तिकीट खिडकी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
भिसेगावकडे तिकिटासाठी स्मार्ट कार्ड मशिन बसविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 2:01 AM