दासगाव : कोकणातील गाव-खेड्यांसह शहरी भागात शिमगा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिमगा म्हणजे होळी उत्सव. शुक्रवारी रंगपंचमीच्या निमित्ताने होळीसाठी तयार केलेला खड्डा बुजवून रंगाची उधळण केली जाते. याच रंगाच्या उधळणीला रंगपंचमी असे म्हटले जाते. शुक्रवारी शिमगा उत्सवाची रंगांची उधळणी करत सांगता झाली. दासगाव गावामध्ये, तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये सांगतानिमित्ताने रंगपंचमीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शिमग्याच्या उत्सवामध्ये महत्त्वाचे दोन भाग येतात. एक होळी आणि मोठ्या होळीनंतर रंगपंचमीपर्यंत साजरा होणारा शिमगा. होळीचे पहिले १० दिवस लहान मुले होळीवर जमून बोंब ठोकतात. रात्रीच्या वेळी वेगवेगळे खेळ खेळले जातात. साधारणत: दहाव्या दिवशी मोठी होळी लावली जाते. यावेळी ग्रामदैवत होळीवर येतात आणि मोठ्या माणसांचा अगर धार्मिक शिमगा उत्सव सुरू होतो. हा उत्सव ५ दिवस चालल्यानंतर रंगपंचमीच्या निमित्ताने होळीचा खड्डा बुजवून ग्रामदैवत आणि ग्रामस्थ रंगांची उधळण करून शिमग्याची सांगता करतात. शहरी भागात मोठ्या होळीच्या दुसऱ्या दिवशी धूळवड साजरी केली जाते. महाराष्ट्राबाहेर आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये याच दिवशी रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी होते. मात्र, कोकणात मोठ्या होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात तसेच जोरदार साजरा केला जातो. या रंगपंचमी सणानिमित्त संपूर्ण दासगाव, तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये महिला, तसेच वयोवृद्ध व लहान मुलांसह मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करत शुक्रवारी हा सण साजरा करण्यात आला. (वार्ताहर)
रंगांच्या उधळणीने शिमग्याची सांगता
By admin | Published: March 18, 2017 3:58 AM