पोलिसांसाठी कोविड सेंटरची उभारणी; ४५ बेडची स्वतंत्र व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:34 PM2020-07-22T23:34:46+5:302020-07-22T23:35:08+5:30
कुलाबा, विसावा वसतिगृहात उपलब्ध केली सुविधा
निखिल म्हात्रे।
अलिबाग : मागील तीन महिन्यांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी आता कोरोनाची शिकार होऊ लागले आहेत. पोलिसांमध्ये वाढत्या कोरोना प्रभावामुळे पोलीस व त्यांच्या कुटुंबामध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. पॉझिटिव्ह अलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्तम उपचार आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयात रायगड पोलीस दलाकरिता ४५ बेडचे स्वतंत्र कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या सुरक्षिततेसाठी अन्य कोणत्याही आरोग्य यंत्रणेवर अवलंबून न राहता वा त्या व्यवस्थेची वाट पाहत न बसता, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी स्वत: पुढाकार घेतल्याने, पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात रायगड पोलीस दल यशस्वी ठरले आहे.
कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा शल्य चिकित्सकांसमवेत सकारात्मक चर्चा करून, क्षणाचाही विलंब न लावता रायगड पोलीस कोविड केअर सेंटरची उभारणी करण्याचा निर्णय घेतला होता. तो प्रत्यक्षात यशस्वी झाला आहे. कर्तव्यावर असताना कोरोना विषाणूची लागण झाली, तर इतर कोणत्याही रु ग्णालयात उपचारासाठी होणारी धावपळ थांबवून, तत्काळ उपचार उपलब्ध व्हावे, यासाठी कुलाबा वसतिगृहात पाच रूममध्ये २१ बेड, तर विसावा वसतिगृहातील ३ हॉलमध्ये २४ बेड अशा एकूण ४५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
रायगड पोलीस विभागाच्या मुख्यालयात उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण आहे. कोरोनाबाधित रु ग्णांकरिता आवश्यक आॅक्सिजन सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपचार पद्धतीच्या पलीकडे जाऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर हे स्वत: या सेंटरमध्ये दाखल कोरोनाबाधित पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असल्याने, त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे, तसेच कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना हँडग्लोव्ज, मास्क, सॅनिटायझर्स देण्यात आले आहेत.
कोरोनाग्रस्त पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या भावना समजून घेत, त्यांच्याशी रोज फोनवरून संवाद साधत आहे. त्यांना आलेले डिप्रेशन दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमच्या अधिकारी कर्मचाºयांवर कशा पद्धतीने उपचार केले जात आहेत, याची माहिती रोज घेण्यात येत आहे. आमच्या कर्मचाºयांचे मनोबल वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- अनिल पारस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड
महिला बचत गटाकडून नाश्ता
च्पोलीस मुख्यालयात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग येथील दोन डॉक्टर व दोन वैद्यकीय अधिकारी हे वेळोवेळी रुग्णांच्या तपासणी करीत आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये दोन आॅक्सिजन व अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
च्कोविड केअर सेंटर हे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या परवानगीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. कोविड केअर सेंटरमधील कोरोनाग्रस्त पोलीस कर्मचाºयांना महिला बचत गटाकडून नाश्ता, दूध, काढा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.