दुहेरी रेल्वेमार्गावर तोडगा !
By admin | Published: August 22, 2015 09:53 PM2015-08-22T21:53:50+5:302015-08-22T21:53:50+5:30
रोह्यातील मौजे खारपटी येथे मध्य रेल्वेच्यावतीने प्रस्तावित पनवेल-रोहा दुहेरी रेल्वेमार्गप्रश्नी योग्य तोडगा काढण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलेले आहे. या कामी रायगडच्या जिल्हाधिकारी
अलिबाग : रोह्यातील मौजे खारपटी येथे मध्य रेल्वेच्यावतीने प्रस्तावित पनवेल-रोहा दुहेरी रेल्वेमार्गप्रश्नी योग्य तोडगा काढण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलेले आहे. या कामी रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांची शिष्टाई सफल झाली आहे. जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी सर्व संबंधितांसह शनिवारी खारपटी गावाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रेल्वे विभागाचे अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्यासोबत चर्चा होऊन याप्रश्नी सकारात्मक तोडगा काढला. ग्रामस्थ व जिल्हा प्रशासन यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेमध्ये महत्त्वाच्या आठ मुद्यांवर चर्चा झाली. पनवेल-रोहा दोन्ही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी केलेली सूचना मान्य करण्यात आली. बाधित होणाऱ्या १६ घरांची नुकसानभरपाई देण्याबाबत महसूल प्रशासनाने सकारात्मक प्रस्ताव तयार करून तो रेल्वे प्रशासनाला सादर करावा व रेल्वे प्रशासनाने तो त्यांच्या वरिष्ठ कार्यालयामार्फत मंजुरीसाठी सादर करावा, दोन्ही प्रस्तावांच्या प्रती ग्रामस्थांना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. रेल्वे व ग्रामस्थ यांच्यामधील हा वाद न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयाचे आदेश रेल्वे प्रशासन व खारपटी ग्रामस्थांनाही बंधनकारक राहील, असे उभयतांनी मान्य केले. बाधित घरांच्या शेजारी सध्या संरक्षक भिंत बांधता येणार नाही. मात्र बाधित कुटुंबांनी न्यायालयास लेखी कळवून संरक्षण भिंत बांधण्याकामी कोणतीही हरकत असणार नाही, असे कळविण्यास व त्याप्रमाणे न्यायालयाने परवानगी दिल्यास रेल्वेकडून संरक्षक भिंत बांधता येईल, अशा समन्वयाने तोडगा काढण्यात आला. (विशेष प्रतिनिधी) रेल्वे प्रशासनाबरोबर दोन ग्रामस्थ करणार कामावर देखरेख ग्रामपंचायत कार्यालयासमोर असणारा सर्व्हिस रोड पुढे गावामध्ये जाणाऱ्या व भुयार मार्गाकडून येणाऱ्या रस्त्यांपर्यंत जोडण्यात येईल. रेल्वेच्या अस्तित्वात असणाऱ्या जागेमध्ये ५ डिग्रीचा ट्रॅक टाकावा व भविष्यात रेल्वेच्या बाजूने निर्णय झाल्यास तो नंतर ३ डिग्रीचा करण्यात यावा. महसूल व रेल्वे विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाच्या प्रती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर पोलीस बंदोबस्त देण्यात येईल व त्यास ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे मान्य करावे. रेल्वेचे काम करतेवेळेस रेल्वे प्रशासनाबरोबर दोन ग्रामस्थांना कामावर देखरेख ठेवण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत परवानगी देण्यात यावी, यासही मान्यता देण्यात आली.