मुरुड जंजिरा : गेल्या काही दिवसांपासून परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गतवर्षी अशाच प्रकारे वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त नागरिकांनी वीज वितरणच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वीज मंडळाने परिसरातील वीजसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, त्यासाठी मनुष्यबळाचा अभाव असल्यास वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करावा, अशा सूचना तहसीलदार उमेश पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या सभेत दिल्या आहेत.मुरुड तहसील कार्यालयात तहसीलदार पाटील यांच्या दालनात विविध खात्यांमधील अधिकारीवर्गाची आपत्ती व्यवस्थपनाबाबत सभा घेण्यात आली होती. या वेळी वीज मंडळाचे शहर विभागाचे अभियंता सूरज आंबुर्ले, गटशिक्षण अधिकारी मेघना धायगुडे, कृषी अधिकारी नारायण गोसावी, मत्सविकास अधिकारी रत्नाकर राजम, तसेच खार बंदिस्ती अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पावसाळा आला की, वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढते, याबाबत नेमके कारणही वीजग्राहकांना दिले जात नाही. शिवाय, वीज किती वेळात येणार याबाबतही कर्मचाऱ्यांकडून माहिती दिली जात नाही, बँक, कार्यालयांतील व्यवहार ठप्प होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.बैठकीत जीर्ण इमारती, धोकादायक शाळांना नोटीस बजावा, सार्वजनिक बांधकाम खात्याने कुठे झाड अथवा दरड कोसळल्यास जेसीपी तयार ठेवण्याच्या सूचनाही या वेळी दिल्या. आपत्ती व्यवस्थापनासाठी मुरु ड तालुक्यात चार नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. तहसील कार्यालय, पंचायत समिती, मुरुड नगरपरिषद व मुरुड पोलीस ठाणे यांच्या सर्व अधिकारीवर्गाला त्यांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत.
खंडित वीजपुरवठ्यावर तोडगा काढण्याच्या सूचना , आपत्ती नियंत्रणासाठी चार कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 5:18 AM