महाड तालुक्यातील बीजगुणन केंद्राची सात एकर जमीन ओसाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 01:27 AM2021-03-28T01:27:26+5:302021-03-28T01:27:35+5:30
निधीअभावी यंत्रणा धूळ खात पडून
दासगाव : शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या तालुका बीजगुणन केंद्राला शासनाने गेल्या चार वर्षांत निधी न दिल्याने विविध उपक्रमांपासून हे केंद्र दुर्लक्षित आहे. येथील शेतीची आधुनिक यंत्रणादेखील धूळ खात पडून आहे. निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या या केंद्रात पाच वर्षांपासून भात बियाणांचे उत्पादनच झालेले नाही, त्यामुळे सुमारे साडेसात एकर जमीन ओसाड पडली आहे.
महाड तालुक्यात कृषी विभागाकडून निर्माण करण्यात आलेल्या तालुका बीजगुणन केंद्राला गेल्या काही वर्षांत निधी उपलब्ध न झाल्याने याठिकाणी भात बियाणांचे उत्पादन यावर्षी झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या केंद्रातून भात बियाणे उपलब्ध न झाल्याने खासगी भात बियाणे अधिक पैसे मोजून विकत घ्यावे लागत आहे. साडेसात एकर परिसरात पसरलेल्या या तालुका बीजगुणन केंद्रात भात बियाणांचे उत्पादन, शेतकरी मार्गदर्शन केंद्र, गांडूळ खत निर्मिती, फळबाग आदी घटकांचा समावेश आहे. याठिकाणी प्रतिवर्षी जवळपास १३५ ते १४० क्विंटल भात बियाणे निर्मिती केली जात होती. स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार किंवा बाजारात मागणी असलेली भात बियाणे याठिकाणी उत्पादन करून शेतकऱ्यांना सवलतीने हे भात बियाणे पुरवठा केले जात होते. यामाध्यमातून केंद्राला अंदाजे पाच लक्ष रुपये प्राप्त होत होते. या बियाणांच्या उत्पादनाकरिता लागणाऱ्या सामग्रीसाठी निधीची आवश्यकता असते; मात्र गेली दोन वर्षे निधी न मिळाल्याने यावर्षी भात बियाणे उत्पादन झाले नाही. या बीजगुणन केंद्रावर उत्पादित केले जाणारे कर्जत २ आणि कर्जत ६ या भात बियाणांना मोठी मागणी आहे.
बीजगुणन केंद्र महाडपासून सुमारे चार किमी अंतरावर आहे. मात्र हे केंद्र महामार्ग आणि महाडपासून आडमार्गावर असल्याने शेतकऱ्यांना याठिकाणी जाण्या-येण्याकरिता वाहनांची सुविधा नाही. वयोवृद्ध शेतकरी या केंद्रापर्यंत जात नाहीत. काळाच्या ओघात या बीजगुणन केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे भविष्यात या केंद्रांची अवस्था बिकट होत चालली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात हरितक्रांतीची सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील सुधारित बियाणांची आणि प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन या केंद्रांची निर्मिती झाली, मात्र आधुनिक काळात बियाणे तयार करणाऱ्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. भविष्यात बीजगुणन केंद्रात भात बियाणे उपलब्ध झाले नाही, तर खासगी कंपन्यांच्या उपलब्धतेवर शेतकऱ्यांना निर्भर राहावे लागेल.
स्थानिक पातळीवर कृषी विभागाची साडेसात एकर जनीन विनावापर ओसाड पडून आहे. विविध प्रकारचे कृषी प्रकल्प या जागेत उभे करून रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केंद्र म्हणून पर्याय उभा करता येऊ शकतो. याशिवाय आधुनिक शेती आणि शेतीपूरक प्रकल्प आणि त्यांचे प्रयोग याठिकाणी उभे करणे आवश्यक आहे. महाड, पोलादपूरमधील शेतकऱ्यांना या केंद्रातून मार्गदर्शन आणि लागणारी कृषी यंत्रणा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल. मात्र स्थानिक आमदारांचे दुर्लक्षदेखील या केंद्राच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरत आहे. साडेसात एकरमध्ये शासनाने उत्तम प्रतीचे कृषीप्रकल्प, नर्सरी, फूल उत्पादन असे प्रकल्प उभे केल्यास कृषी पर्यटनाला याठिकाणी नक्कीच चालना मिळेल.