म्हसळा तालुक्यातील सात अंगणवाड्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:14 AM2018-07-17T02:14:47+5:302018-07-17T02:14:49+5:30
शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तोंडसुरे, चिखलप, मेंदडी कोळीवाडा, मेंदडी आदिवासीवाडी, रोहिणी, पानवे या गावातील अंगणवाड्यांची परिस्थिती पाहिल्यावर येथे शिक्षणाचा पायाच धोक्यात असल्याचे दिसत आहे.
- अरुण जंगम
म्हसळा : शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तोंडसुरे, चिखलप, मेंदडी कोळीवाडा, मेंदडी आदिवासीवाडी, रोहिणी, पानवे या गावातील अंगणवाड्यांची परिस्थिती पाहिल्यावर येथे शिक्षणाचा पायाच धोक्यात असल्याचे दिसत आहे. यापैकी काही अंगणवाड्यांना तडे गेले आहेत. चिमुरडी मुले जीव मुठीत घेऊन अक्षरे गिरवित आहेत.
म्हसळा तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे.विशेषत: ग्रामीण भागातील अंगणवाड्यांकडे स्थानिक प्रतिनिधींसहित प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने असे घडते आहे.पावसाळ्यात अनेक अंगणवाड्यांच्या शेड व छतासाठी बसविलेल्या पत्र्यांमधून पाणी पडत असल्याने अंगणवाडीमध्ये येणाºया अनेक छोट्या बालकांची गैरसोय होत आहे.मात्र या सर्व गोष्टींकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक अंगणवाड्यांच्या इमारती खूप जुन्या व जीर्ण झाल्या आहेत.विशेषत: मेंदडी गावातील कोळीवाडा व आदिवासीवाडीवरील इमारती धोकादायक असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील तोंडसुरे या गावातील अंगणवाडीची इमारतच कोसळली असल्याने पर्यायी म्हणून ज्या गावातील घरामध्ये बसविले जाते ते पाहिल्यावर खरोखरच सुरक्षित आहे की नाही अशी कल्पना येते. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे दुरुस्तीचे अथवा पुनर्बांधणीचे सर्व प्रस्ताव अद्यापही धूळखात पडले आहेत.त्यामुळे या मुलांना बसण्यासाठीही व्यवस्थित जागा नाही. अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी एक वर्षापूर्वीच दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे तसेच सदर ग्रामपंचायतीला देवून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप झालेली नाही.इमारतीची दुरुस्ती व नव्याने उभारण्याची मागणी होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे.
मुख्य पर्यवेक्षिका तसेच बालविकास विस्तार अधिकारी यांनी अनेक वेळा संबंधित धोकादायक अंगणवाड्या असलेल्या ग्रामपंचायतींकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे, तसेच अंगणवाड्यांमध्ये वीज जोडणीसाठीही प्रश्न उपस्थित केले आहेत, परंतु याकडे कोणीही गांभीर्याने विचार करीत नाही.याबाबत प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी रेणुका पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी अंगणवाडीच्या इमारतीत मुलांना बसवू नये, असा आदेश दिला आहे. ही इमारत दुरुस्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. त्यांच्या स्तरावर याबाबत कारवाई व्हावी, असे त्यांनी सांगितले.
>बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येणाºया मासिक सभेमध्ये याच विषयावर पाठपुरावा करून मंजुरी आणणार आहोत.
-मधुकर गायकर, उपसभापती पंचायत समिती म्हसळा
>अंगणवाड्यांमधील सेविकांना अतिवृष्टीमध्ये मुलांना सदर इमारतीमध्ये न बसविण्याचे आदेश दिले. गेल्या दोन वर्षांपासून नवीन इमारत बांधणीसाठी प्रस्ताव पाठवला मंजुरी मिळालेली नाही.
-रेणुका पाटील, मुख्य पर्यवेक्षिका तसेच प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी
>सदर धोकादायक अंगणवाड्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले असून सदर बाबतीत पाठपुरावा सुरूआहे.प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास तत्काळ काम सुरू करण्यात येईल.
- वाय.एम.प्रभे, गटविकास अधिकारी, म्हसळा पंचायत समिती
>मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदर प्रकरणांना मंजुरी देण्यात येईल.
-अदिती तटकरे, जि.प.अध्यक्षा अलिबाग