माणगाव : मांडूळ साप जवळ बाळगल्याने घरात धनदौलत येते. या अंधश्रद्धेतून रायगड जिल्ह्यात या मांडूळ सापाची तस्करी करून मोठ्या प्रमाणात माया गोळा केली जात आहे. या अंधश्रद्धेला बळी पडून माणगाव तालुक्यातील विविध गावांतील सात संशयितांना पाठलाग करून मांडूळ तस्करीप्रकरणी वनविभाग अधिकाऱ्यांनी पडकले आहे. त्यांना शुक्रवारी माणगाव न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
माणगाव परिसरात वनविभाग रात्रीची गस्त घालत असताना, त्यांना मांडूळ सापाची तस्करी होणार आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार वनविभागाने साध्या वेशात जाऊन इंदापूर जवळील वावेदिवाळी फाट्यावर ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान सापळा रचला होता. त्या वेळी संशयित आरोपी काळी पिशवी घेऊन मांडूळ साप विकत घेणाºयाची वाट पाहत बसले होते. मात्र, त्यांनी हे अधिकारी जवळ येताच अधिकाऱ्यांना ओळखले व ते तत्काळ स्वत: जवळची दुचाकी घेऊन ते रुद्रवली गावाकडे पळून जात होते. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातील आरोपींनी गुंगारा दिला. मात्र, अधिकाºयांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर रुद्रवली येथील शाळेजवळ मांडूळ जातीच्या पकडलेल्या सापाची पिशवी टाकून दिली. त्या आरोपींची दुचाकी पोटणेर आदिवासीवाडी येथे मिळाली. त्यानंतर आरोपींनी तेथून पलायन केले. हा पाठलाग एका चित्रपटातील थरारक असा होता. विभाग अधिकाºयांनी मांडूळ सापाची पिशवी आपल्या ताब्यात घेऊन माणगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शहा यांचे मार्गदर्शन घेतले. त्या पिशवीमध्ये सापडलेले दोन मांडुळांपैकी एक ९०० ग्रॅम वजन व लांबी ३६ इंच, तर दुसरा १२०० ग्रॅम वजन ३९ इंचाचे होते. त्या दोन्ही सापांना जंगलामध्ये सुखरूप सोडण्यात आले.तपास करताना मिळालेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून तळा तालुक्यातील बोरघर हवेली येथून मुख्य संशयित प्रकाश विठ्ठल जाधव (४०, रा.बोरघर हवेली) यास इंदापूर बाजापेठेतून पकडण्यात आले. सुनील शिवराम जाधव (२३), संदीप शिवराम जाधव (३०), रितेश कृष्णा जाधव (२५, बोरघर हवेली, आदिवासीवाडी), देवजी शंकर जाधव (५०, वावेदिवाळी आदिवासीवाडी), संतोष नारायण चव्हाण (३१, अर्नाळा, तळा), सुबोध सुनील गंभीर (२६, रा. रातवड) अशा एकूण सात जणांना पकडण्यात आले. आरोपी प्रकाश विठ्ठल जाधव, सुनील शिवराम जाधव हे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मालडा या गावात खोदकाम करीत असताना हे दोन साप सापडले होते. त्यांनी हे साप सुमारे दीड महिना स्वत:जवळ बाळगले होते. वरील सात जणांवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा करण्यात आला आहे. त्यांना माणगाव न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास उपवनसंरक्षक मनीषकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव वनक्षेत्रपाल पी. आर. पाटील, निजामपूर वनपाल एस. एस. चव्हाण, चन्नाट वनपाल व्ही. एस. तांबे, वनरक्षक जे. आर. पाडवी, के. एन. वाघमारे, आर. डी. देवरे, ए. एस. मोरे, व्ही. एम. मुंडे, के. के. बेणके हे करीत आहेत.